बराक ओबामा इसिसचे संस्थापक, ट्रम्प यांची खरमरीत टीका
By admin | Published: August 11, 2016 05:58 PM2016-08-11T17:58:29+5:302016-08-11T17:58:29+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे इसिस दहशतवादी संघटनेचे संस्थापक असल्याची घणाघाती टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 11 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे इसिस दहशतवादी संघटनेचे संस्थापक असल्याची घणाघाती टीका अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. गेल्या काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर इसिसच्या संस्थापक असल्याचा आरोप केला होता. आता त्यांनी नव्याने थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाच लक्ष्य केलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना ट्रम्प यांनी इसिस या दहशतवादी संघटनेचे संस्थापक बनवून टाकल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री फ्लोरिडा येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी हा आरोप केला. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी ओबामा यांना 'बराक हुसेन ओबामा' असे संबोधून त्यांचं मुस्लिमांशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांनी भाषण देताना "ते इसिसचे संस्थापक आहेत' असा तीनदा उल्लेख केला.
प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य करून ट्रम्प नेहमीच चर्चेत राहत असतात. याआधी "क्लिंटन यांना अध्यक्षपदापासून शस्त्रधारी व्यक्तीच दूर ठेवू शकतो,' असे वक्तव्य त्यांनी केले . त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. मात्र त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर ओबामा हे मुस्लिम असून, त्यांचा जन्म केनियात झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र ओबामा हे ख्रिश्चन असून, हवाई येथे त्यांचा जन्म झाल्याची माहिती समोर आली आहे.