जगभर : बराक ओबामा आणि मिशेल यांच्यात काही बिनसलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 08:31 IST2025-04-15T08:29:02+5:302025-04-15T08:31:30+5:30

Barack Obama Michelle Obama news: बराक आणि मिशेल हे दोघे नक्की वेगळे होणार, अशा चर्चा सुरू झाल्या. समाजमाध्यमांवर अटकळी बांधणाऱ्या अनेकांनी तर बराक यांचं नाव काही स्त्रियांशी जोडायलाही सुरुवात केली होती.

barack obama michelle obama divorce speculations Is there something wrong between Barack and Michelle | जगभर : बराक ओबामा आणि मिशेल यांच्यात काही बिनसलंय का?

जगभर : बराक ओबामा आणि मिशेल यांच्यात काही बिनसलंय का?

Barack Obama and Michelle Obama: मेलिंडा आणि बिल गेट्स यांच्या ‘वेगळं’ होण्याचा मोठा धक्का अमेरिकेला बसला होता. त्यानंतर  बराक आणि मिशेल ओबामा या जोडप्यातही काहीतरी बेबनाव सुरू असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. एकतर अचानक बराक ओबामा एकटेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसू लागले. महत्त्वाच्या औपचारिक कार्यक्रमांनाही मिशेल त्यांच्यासोबत दिसेनाशा झाल्या. ट्रम्प यांच्या दुसऱ्या सत्ताग्रहण सोहळ्याला, माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनानंतरच्या श्रद्धांजली सभेलाही मिशेल ओबामांसोबत नव्हत्या. मग काय, लोकांना विषयच मिळाला ! 

बराक आणि मिशेल हे दोघे नक्की वेगळे होणार, अशा चर्चा सुरू झाल्या. समाजमाध्यमांवर अटकळी बांधणाऱ्या अनेकांनी तर बराक यांचं नाव काही स्त्रियांशी जोडायलाही सुरुवात केली होती. पण या चर्चेबाबत ओबामा दाम्पत्यानं ना काही प्रतिक्रिया दिली, ना नाराजी व्यक्त केली.

मिशेल ओबामा तर जराही अस्वस्थ झाल्या नाहीत. लोकांची तोंडं बंद करायला सरसावल्या नाहीत. का? ‘वर्क इन प्रोग्रेस’ या सोफिया बुशच्या पाॅडकास्टमध्ये मुलाखत देताना मिशेल यांनी पहिल्यांदाच जाहीररीत्या त्यांच्या सहजीवनाबद्दल काही वक्तव्यं केलं आहे. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना मिशेल सामाजिक जीवनात अतिशय आत्मविश्वासाने वावरायच्या. भाषणं द्यायच्या. 

मुलींच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यपूर्ण आहाराचं महत्त्व लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी त्यांनी मोठ्या उत्साहाने काम सुरू केलं होतं. पण आठ वर्षांपूर्वी व्हाइट हाउस सोडल्यानंतर मिशेल ओबामा यांचं जग बदललं. त्याबद्दल बोलताना मिशेल म्हणाल्या,  ‘मुलींना मी त्यांचं आयुष्य जगू दिलं खरं, पण एक आई  म्हणून  त्यांच्या आयुष्यात माझी लुडबूड चालूच राहिली. बराक राष्ट्राध्यक्ष असल्याने त्यांच्या पदाची, त्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी काय करायला हवं, काय नको याचा विचार मला सतत करावा लागला. या सगळ्या झंझावातात मी स्वत:ला स्वत:च्या इच्छेप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्यच दिलं नाही, याची खंत माझ्या मनाशी होती. ती दूर करण्यासाठी मी काही निर्णय घेतले. सार्वजनिक कार्यक्रमांना बराकबरोबर हजर राहाण्याचं बंधन थोडं दूर केलं. मी कुठे जावं, काय करावं याबद्दल मला काय वाटतं याचा विचार करायला सुरुवात केली  आणि ते बरोबरच होतं !’. 

स्वत:च्या इच्छेने स्वत:चं आयुष्य जगताना मिशेल यांना एकाच वेळेस लोकांनी पसरवलेल्या अफवांचा सामना करावा लागला. पण ‘जे लोकांना वाटतं ते करण्याचं नाकारून आपण खूप खुश असल्या’चं मिशेल सांगतात. एक स्त्री म्हणून लोकांनी ठरवलेल्या चौकटीत स्वत:ला बांधून घेण्याचा, इतरांना काय हवं आहे याचा विचार करत दमत राहण्याचा संघर्ष जगातल्या प्रत्येक स्त्रीला करावा लागतो.  आता मात्र हा संघर्ष आपण आपल्या आयुष्यातून हद्दपार केला आहे, असं त्या या मुलाखतीत म्हणाल्या.

बराक यांच्याबरोबरचं आपलं सहजीवन उत्तम चालू असल्याचंही मिशेल यांनी हसत हसत सांगितलं. ‘खूप काळानंतर मला मी काय करते, कोणासाठी करते याची उत्तरं सापडली आहेत’, अशी कबुली देणाऱ्या मिशेल यांनी जगभरातल्या बायकांना स्वत:च्या मनाप्रमाणे जगण्याची एक खिडकी आपल्या आयुष्यात असते, याची जाणीव दिली आहे !... आणि ती खिडकी उघडण्याची प्रेरणाही !

Web Title: barack obama michelle obama divorce speculations Is there something wrong between Barack and Michelle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.