‘बॅटवूमन’ने शोधला वटवाघळ कोरोना विषाणू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 05:54 IST2025-02-23T05:54:24+5:302025-02-23T05:54:33+5:30

शी झेंगली यांनी बॅट कोरोना व्हायरसवर बरेच संशोधन केले असल्याने त्या ‘बॅटवूमन’ म्हणून प्रसिद्ध आहेत. 

'Batwoman' discovers bat coronavirus | ‘बॅटवूमन’ने शोधला वटवाघळ कोरोना विषाणू

‘बॅटवूमन’ने शोधला वटवाघळ कोरोना विषाणू

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : चिनी संशोधकांनी वटवाघळातील नवीन कोरोना विषाणू शोधला आहे. त्यात मानवांना संक्रमित करण्याची क्षमता असू शकते. हा विषाणू कोविड-१९ पसरवणाऱ्या सार्स-सीओव्ही-२ विषाणूमध्ये असलेल्या प्रथिनांचा वापर करून पेशींमध्ये प्रवेश करतो.
या नवीन विषाणूवरील अभ्यास सेल सायंटिफिक जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. हे संशोधन ग्वांगझू प्रयोगशाळेतील शी झेंगली आणि त्यांच्या टीमने केले आहे. शी झेंगली यांनी बॅट कोरोना व्हायरसवर बरेच संशोधन केले असल्याने त्या ‘बॅटवूमन’ म्हणून प्रसिद्ध आहेत. 

विषाणू मानवासाठी किती घातक ?
चीनमध्ये वटवाघळांमध्ये एचकेयू५-सीओव्ही-२ आढळला आहे. यांच्यात मानवांना संक्रमित करण्याची क्षमता असली, तरी तो प्राण्यांपासून थेट मानवांमध्ये पसरू शकतो की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जरी जंगलात शेकडो कोरोना व्हायरस अस्तित्वात असले, तरी त्यापैकी फक्त काही मानवांना संक्रमित करण्यास सक्षम आहेत.

‘बॅटवूमन’चे संशोधन काय म्हणते...
हे संशोधन चीनच्या शी झेंगली आणि त्यांच्या टीमने ग्वांगझू अकादमी ऑफ सायन्सेस, वुहान विद्यापीठ आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांच्या सहकार्याने केले आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, एचकेयू५-सीओव्ही-२ मध्येदेखील ‘फ्युरिन क्लीवेज साइट’सारखेच वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे ते एसीई२ प्रथिनाद्वारे मानवी पेशींमध्ये प्रवेश करू शकते.
मात्र, एचकेयू५-सीओव्ही-२ मानवी पेशींमध्ये तितक्या सहजपणे प्रवेश करत नाही, जितका सार्स-सीओव्ही-२, कोविड-१९ पसरवणारा विषाणू करू शकतो.
प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांमध्ये असे आढळून आले की, हा विषाणू उच्च-एसीई२ पातळी असलेल्या मानवी पेशींना विशेषतः आतड्याच्या आणि श्वसनमार्गाच्या पेशींना संक्रमित करू शकतो. 
हा विषाणू मानवामध्ये इतक्या लवकर पसरणार नाही. त्यामुळे याबद्दल जास्त घाबरण्याची गरज नाही.

Web Title: 'Batwoman' discovers bat coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.