सावधान! कोरोना लसीवर इंटरपोलचा मोठा इशारा; भारतासह १९४ देशांना केले सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 12:04 PM2020-12-03T12:04:38+5:302020-12-03T12:15:25+5:30
CoronaVirus Vaccine: जगभरात तीन कोरोना लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. या लसी आपापल्या देशांच्या नागरिकांना देण्यासाठी प्रत्येक देश ताकद पणाला लावू लागला आहे. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे जगातील सर्वात मोठी लस बनविणारी कंपनी भारतातीलच आहे.
पॅरिस : जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकुळ सुरु असताना आता कोरोनावर लसी येत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिका, ब्रिटनमध्ये तर तातडीचे कोरोना लसीकरण सुरु करण्यास मान्यताही देण्यात आली आहे. यामुळे कोरोनाचा धुमाकुळ संपण्याची चिन्हे असताना आता जागतिक सुरक्षा यंत्रणा इंटरपोलने कोरोना लसीबाबत मोठा इशारा दिला आहे.
Interpol has issued a global alert to law enforcement across its 194 member countries warning them to prepare for organized crime networks targeting #COVID19 vaccines, both physically & online: Statement pic.twitter.com/FLkMzOLURt
— ANI (@ANI) December 3, 2020
कोरोना लसीला संघटित गुन्हेगारी क्षेत्राकडून मोठा धोका आहे. ते कोरोना लसीला प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने धोको पोहोचवू शकतात. हे गुन्हेगार कोरोनाची बनावट लस तयार करून काळ्या बाजारात आणू शकतात किंवा कोरोना लसीचा साठा चोरण्याची शक्यता आहे, असा इशारा इंटरपोलने दिला आहे.
इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्समध्ये आहे. तसेच इंटरपोलचे १९४ देश सदस्य आहेत. या सर्व देशांना इंटरपोलने सावध राहण्याचा व या संघटित गुन्हेगारांचे हल्ले परतवून लावण्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
अमेरिका, युरोप, रशिया, भारतासह अनेक देश कोरोना लसीच्या वितरणावर आणि लसीकरणाच्या योजनेवर काम करत आहेत. यामुळे हे गुन्हेगार कोरोना लसीला लक्ष्य करू शकतात. यासाठी खोट्या वेबसाईट, रुग्ण बरे झाल्याचे खोटे दावे किंवा अन्य प्रकारे कोरोना लसीला धोका पोहोचवू शकतात, असे इंटरपोलचे सरचिटणीस ज्युर्गेन स्टॉक यांनी सांगितले आहे.
तुम्हाला कोरोना लस कधी मिळणार? SMS पाठवून वेळ, ठिकाण कळविणार सरकार
जगभरात तीन कोरोना लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. या लसी आपापल्या देशांच्या नागरिकांना देण्यासाठी प्रत्येक देश ताकद पणाला लावू लागला आहे. भारतासाठी जमेची बाजू म्हणजे जगातील सर्वात मोठी लस बनविणारी कंपनी भारतातीलच आहे. यामुळे लस पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे कामाला लागली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये लसीच्या वितरणावर चर्चा करण्यात आली. यामध्ये मोदींनी लस कधी येईल हे आपल्या हाती नसल्याचे सांगितले. तर यात राजकारण करू नये, महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सामान्य लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवावी अशी मागणी केली आहे.
यामुळे कोरोनाची लस जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून देशातील प्रत्येक नागरिकाला ही लस दिली जाणार आहे. यासाठी काही टप्पे ठरविण्यात आले आहेत. यानुसार सुरुवातीला कोरोनाची लस ही आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरिअरना दिली जाणार आहे. यानंतर वरिष्ठ नागरिकांना दिली जाईल. या यादीत ज्यांची नावे असतील त्यांना एसएमएसद्वारे लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण कळविले जाणार आहे. याचबरोबर या मेसेजमध्ये लसीकरण करणारी संस्था, आरोग्य सेवकाचे नाव असणार आहे.
पहिला डोस दिल्य़ानंतर दुसरा डोस कधी मिळणार याचीही माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल. जेव्हा दोन्ही डोस दिले जातील तेव्हा एक डिजिटल QR आधारित सर्टिफिकेट दिले जाणार आहे. हा लसीकरण झाल्याचा पुरावा असणार आहे. या साऱ्या तयारीसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. यामध्ये कोरोना लसीचा स्टॉक, वितरण, लसीकरण आदी ट्रॅक केले जाणार आहे.