सावधान! मागच्या पावलाने डिप्रेशन येईल
By admin | Published: July 18, 2015 03:03 AM2015-07-18T03:03:18+5:302015-07-18T03:03:18+5:30
तुमचे मन निराशा, औदासिन्याकडे झुकत असेल, तर तुमचा स्मार्ट फोनचा वापर किती हे एकदा तपासून पाहा. स्मार्ट फोनचा अतिरिक्त वापर निराशेला व डिप्रेशनला कारणीभूत
वॉशिंग्टन : तुमचे मन निराशा, औदासिन्याकडे झुकत असेल, तर तुमचा स्मार्ट फोनचा वापर किती हे एकदा तपासून पाहा. स्मार्ट फोनचा अतिरिक्त वापर निराशेला व डिप्रेशनला कारणीभूत ठरतो असा नव्या संशोधनाचा निष्कर्ष आहे. सतत फोनवर वेळ घालवणे आरोग्याला बाधक असून ते तुमच्या डिप्रेशनचे द्योतक ठरू शकते, असे नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे.
६८ मिनिटे स्मार्ट फोनवर बोलणाऱ्या व्यक्ती डिप्रेशनग्रस्त असतात असा निष्कर्ष आहे. १७ मिनिटे स्मार्ट फोनवर बोलणाऱ्या व्यक्ती मात्र या मानसिक विकाराला बळी पडत नाहीत. फोनमधील ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) चा वापर करून केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की, फोनवर जास्त वेळ घालविणारे लोक घराबाहेर पडत नाहीत. त्यांच्या दिनक्रमात वेळेचे महत्त्व नसते. हे लक्षण डिप्रेशनच्या व्याधीचे आहे. हे लोक वेळेवर आॅफिसला जात नाहीत, वेळेवर काम करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रगतीला खीळ बसते. या संशोधनात २८ लोकांच्या फोन व जीपीएस वापराचा अभ्यास करण्यात आला. त्यात २० महिला व ८ पुरुष होते. त्यांच्या फोनला बसविलेला सेन्सर दर पाच मिनिटांनी फोनवरील त्यांचे भौगोलिक स्थान व फोनचा वापर याची माहिती देत असे. या माहितीच्या आधारे संशोधकांनी त्यांच्या डिप्रेशनची पातळी ठरवली. हा निष्कर्ष ८७ टक्के अचूक ठरला. (वृत्तसंस्था)
स्मार्ट फोनचा अधिक वापर करणाऱ्या व्यक्ती बोलण्याऐवजी सर्फिंग करतात, तसेच गेम खेळतात. जीवनातील दु:ख, ताणतणाव यांचा सामना त्यांना करता येत नाही, त्यामुळे मोबाईल फोनच्या विश्वात मन रमविले जाते. परिस्थितीचा सामना करता न येणे हाही डिप्रेशनचा एक प्रकार आहे, असे नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठातील बिहेवियरल इंटरव्हेन्शन टेक्नॉलॉजीचे संचालक डेव्हिड मोअर यांनी म्हटले आहे.