धमक्यांचे परिणाम भोगायला तयार राहा - डोनाल्ड ट्रम्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:13 PM2017-08-12T23:13:43+5:302017-08-12T23:14:26+5:30
उत्तर कोरियाच्या धमक्यांमुळे संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिणाम भोगायला तयार राहा, असे उत्तर कोरियाचे लष्करशहा किम जोंग उन यांना सुनावले आहे.
वॉशिंग्टन : उत्तर कोरियाच्या धमक्यांमुळे संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिणाम भोगायला तयार राहा, असे उत्तर कोरियाचे लष्करशहा किम जोंग उन यांना सुनावले आहे.तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
युद्धाच्या शक्यतेमुळे उत्तर कोरियातील तब्बल ३५ लाख लोकांनी सैन्यात दाखल होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त तेथील सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे. उत्तर कोरियातील लष्करात सध्या सव्वा लाख जवान असून, पावणे आठ लाख लोकांचे राखीव दलही त्या देशाकडे आहे. मात्र क्षेपणास्त्रांच्या आधारे युद्ध करण्याची भाषा असल्याने एवढ्या मोठ्या सैन्याची गरज काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये शाब्दिक रोज चकमकी सुरू आहेत.किम जोंग-उनने अशाच धमक्या देणे सुरू ठेवल्यास विनाशकारी हल्ल्याला उत्तर कोरियाला सामोरे जावे लागेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीही म्हटले होते.
उत्तर कोरियाने खोड काढणे सुरूच ठेवले, तर आम्हीदेखील उत्स्फूर्तपणे त्या देशाला प्रत्युत्तर देऊ, असे ट्रम्प म्हणाले होते.