युद्धासाठी सज्ज राहा! चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 12:01 PM2022-11-10T12:01:03+5:302022-11-10T12:01:29+5:30
तैवानबरोबर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्याचा आदेश दिला.
बिजिंग :
तैवानबरोबर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्याचा आदेश दिला. चीनच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप त्यांनी केला.
चीनच्या सेंटर ऑफ सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या कार्यालयाला शी जिनपिंग यांनी भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले की, चीन आपल्या लष्कराला आणखी आधुनिक प्रशिक्षण देऊन युद्धासाठी सदैव सज्ज ठेवणार आहे. युद्धात आपल्याला जिंकायचे आहे हेच ध्येय ठेवून प्रत्येक चिनी सैनिकाने रणांगणात लढले पाहिजे.
शी जिनपिंग म्हणाले की, चीनचे सार्वभौमत्व, सुरक्षा टिकविण्यासाठी लष्कराने कायम सतर्क व सज्ज राहायला हवे. देशातील सत्ताधारी पक्ष व जनतेने जो कार्यक्रम आखला आहे, त्याच्या अंमलबजावणीसाठी लष्कराने योगदान दिले पाहिजे. लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी चीनने तंत्रज्ञानात स्वावलंबी होणे आवश्यक आहे.
आक्रमक पवित्रा
- तैवान हा आमचाच अविभाज्य भाग आहे. त्या देशावर ताबा मिळविण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
- चीनमध्ये विलिन होण्यास विरोध असलेल्या तैवानवर कारवाई केल्यास आम्ही हस्तक्षेप करू, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याआधीच दिला होता.