पाणबुडी बांधणी प्रकल्पातून फ्रान्स नाैदलाची माघार, निविदा सुरू ठेवण्यास असमर्थता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 05:32 AM2022-05-04T05:32:31+5:302022-05-04T05:33:05+5:30
या प्रकल्पांतर्गत भारतीय नौदलासाठी सहा पारंपरिक पाणबुड्या बांधल्या जाणार होत्या.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्सच्या नियोजित दौऱ्याच्या आधी फ्रान्सच्या नौदल गटाने पी-७५ इंडिया (पी-७५ आय) प्रकल्पात सहभागी होण्यास असमर्थ असल्याचे जाहीर केले आहे. या प्रकल्पांतर्गत भारतीय नौदलासाठी सहा पारंपरिक पाणबुड्या बांधल्या जाणार होत्या.
हा प्रकल्प ४३ हजार कोटींचा असून त्यासाठी पाच आंतरराष्ट्रीय संस्था निवडण्यात आल्या होत्या. फ्रान्सचा नौदल गट त्यापैकी एक आहे. या गटाने आम्ही रिक्वेस्ट फॉर प्रपोझलच्या अटी पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे निविदा पुढे सुरू ठेवणार नाही, असे म्हटले आहे.
नव्या व्यूहरचनात्मक भागीदारी मॉडेलअंतर्गत हा प्रकल्प फार महत्त्वाचा होता. पी-७५ आय हा भारतात पाणबुड्या बांधण्याचा दुसरा प्रकल्प आहे. नॅव्हल ग्रुपने पी-७५ प्रकल्पाअंतर्गत ६ कालवरी क्लास पारंपरिक पाणबुड्या बांधण्याचे काम भारतात माझगाव डॉकयार्ड शिपबिल्डिंग लिमिटेडच्या भागीदारीत नुकतेच पूर्ण केले आहे.