भारत-पाकिस्तानमध्ये पडद्यामागे चर्चेला सुरुवात; काश्मीरवरून मोदी सूट देण्याच्या मूडमध्ये नाहीत : दावा:
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 04:31 PM2022-05-30T16:31:26+5:302022-05-30T16:31:46+5:30
दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध देखील संपुष्टात आले होते. दोन्ही देशांदरम्यानचा प्रवासही बंद झाला होता.
इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानातील बिघडलेले संबंध पुन्हा पुर्ववत करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदीपाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना काश्मीरवर कोणतीही सूट देण्याच्या मूडमध्ये नसल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या बातमीमध्ये सूत्रांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. दोन्ही देशांमधील संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावाचे आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा भारत सरकारने काढून घेतला होता. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते.
दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध देखील संपुष्टात आले होते. दोन्ही देशांदरम्यानचा प्रवासही बंद झाला होता. मात्र, शाहबाज शरीफ येण्यापूर्वीपासून दोन्ही देशांमध्ये पडद्याआड चर्चा सुरु आहेत. यामुळे फेब्रुवारी २०२१ मध्ये युद्धबंदी कराराचे नुतनीकरण शक्य झाले. यानंतर त्याचे उल्लंघन केल्याची मोठी घटना घडली नाही, असा दावा करण्यात आला आहे.
एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तात एका अधिकृत सुत्राचा हवाला देण्यात आला आहे. "याला बॅक चॅनल म्हणा, ट्रॅक-2 म्हणा किंवा पडद्यामागील चर्चा म्हणा, दोन्ही देशांतील संबंधित लोक एकमेकांशी बोलत आहेत, हे मी सांगू शकतो. मात्र याची अचूक माहिती नाही'', असे या सुत्राने म्हटले आहे.
तज्ज्ञांनुसार पाकिस्तानमधील राजकीय अनिश्चितता आणि दोन्ही बाजूंनी चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी कठोर अटी पाहता तात्काळ यश मिळण्याची शक्यता कमी आहे. परंतू, दोन्ही बाजुंनी व्यापार पुन्हा सुरु होऊ शकतो.
मला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत पण आधी काश्मीरवर चर्चा करावी लागेल, असे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले होते. भारताला काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा लागेल, असेही तेम्हणाले होते. परंतू मोदी यासाठी तयार होतील असे वाटत नाही.