रकमेच्या अपहारप्रकरणी बेगम खालिदा झिया यांना पाच वर्षांचा तुरुंगवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 03:53 AM2018-02-09T03:53:39+5:302018-02-09T03:53:44+5:30
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) या विरोधी पक्षाच्या प्रमुख बेगम खालिदा झिया यांना विशेष न्यायालयाने भ्रष्टाचाराबद्दल पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) या विरोधी पक्षाच्या प्रमुख बेगम खालिदा झिया यांना विशेष न्यायालयाने भ्रष्टाचाराबद्दल पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यांना श्क्षिा ठोठावली जाताच, त्यांचे न्यायालयात आलेले नातेवाईक व कार्यकर्ते तिथेच रडू लागले. त्यावर ‘तुम्ही अजिबात रडू नका, मी लवकरच बाहेर येईन’, असे खालिदा झिया यांनी त्यांना सांगितले.
झिया आॅर्फनेज ट्रस्ट आणि झिया चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांच्या नावे परदेशांतून मिळालेल्या २१ दशलक्ष टका (सुमारे २.५२ लाख डॉलर) देणग्यांच्या रकमांचा खासगी वापरासाठी अपहार केल्याच्या आरोपावरून ७२ वर्षांच्या बेगम झियांना ही शिक्षा ठोठावली. झिया यांचा मुलगा तारिक व इतर चौघांना याच खटल्यात प्रत्येकी १० वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.
निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात जाऊ , असे बेगम झिया यांच्या वकिलांनी निकालानंतर सांगितले.
२००१-२००६ या काळात बेगम झिया यांच्या नेतृत्वाखाली ‘बीएनपी’चे सरकार सत्तेवर असताना या दोन स्वयंसेवी संस्था केवळ कागदावर स्थापन केल्या गेल्या व त्यांच्या देणग्यांचा अपहार केला गेला, या आरोपावरून भ्रष्टाचार विरोधी आयोगाने हा खटला दाखल केला होता. हा खटला रद्द केला जावा यासाठी बेगम झिया यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयात दोनदा याचिका केल्या होत्या. परंतु त्या फेटाळल्या गेल्या होत्या. (वृत्तसंस्था)
>पोलीस-समर्थकांमध्ये झटापट
बेगल खालिदा झिया यांच्या खटल्याचा निकाल लागणार असल्याने त्यांच्या बांग्लादेश नॅशनल पार्टीचे हजारो कार्यकर्ते सकाळपासून ढाका शहरात जमू लागले होते.
त्यामुळे ढाक्यात तणाव निर्माण झाला होता.
त्यांनी आंदोलन करू नये आणि शहरात वा देशात हिेंसाचार होऊ नये, यासाठी सर्वत्र पोलीस व सुरक्षा दलाचे जवान यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
काही ठिकाणी सुरक्षा दलाचे जवान व बाग्लादेश नॅशनल पार्टीचे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली तसेच काही भागांत दगडफेकीचे प्रकारही घडले. ढाका शहरात व देशाच्या काही भागांत तणाव आहे.
>कोर्टाचा निर्णय ऐकून रडणारे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना खालिदा झिया म्हणाल्या, ‘तुम्ही अजिबात रडू नका, मी लवकरच बाहेर येईन’!