न्यू यॉर्कपेक्षा बीजिंगमधील अब्जाधीशांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 03:46 AM2021-04-10T03:46:37+5:302021-04-10T03:47:00+5:30

मुंबई आठव्या स्थानी : सर्वोच्च दहा शहरांत पाच शहरे चीनमधील

Beijing overtakes New York City as home to most billionaires, Mumbai behind London | न्यू यॉर्कपेक्षा बीजिंगमधील अब्जाधीशांची संख्या अधिक

न्यू यॉर्कपेक्षा बीजिंगमधील अब्जाधीशांची संख्या अधिक

Next

न्यूयॉर्क : सर्वाधिक अब्जाधीशांचा निवास असणाऱ्या शहरांच्या यादीत चीनच्या बीजिंगने अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटीवर मात करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी न्यूयॉर्क सिटीमधील अब्जाधीशांच्या संख्येत केवळ नऊजणांची नव्याने भर पडली असताना बीजिंगमध्ये ३३ नवीन अब्जाधीश बनले आहेत. त्या बळावर बीजिंगने या यादीत चौथ्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

फोर्बेस नियतकालिकाने जारी केलेल्या अहवालानुसार,  बीजिंगमध्ये आता १०० जण अब्जाधीश असून न्यूयॉर्क सिटीपेक्षा एक अब्जाधीश बीजिंगमध्ये अधिक आहेत. एकूण शुद्ध संपत्तीच्या बाबतीत मात्र न्यूयॉर्क सिटी प्रथम स्थानी आहे. बीजिंगमधील अब्जाधीशांच्या संपत्तीचे एकूण मूल्य ४८४ अब्ज डॉलर असून न्यूयॉर्क सिटीमधील अब्जाधीशांच्या संपत्तीचे एकूण मूल्य ५६० अब्ज डॉलर आहे. मायकेल ब्लूमबर्ग हे न्यूयाॅर्क सिटीतील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 

अब्जाधीशांचा निवास असलेल्या जगातील सर्वोच्च १० शहरांत पाच शहरे चीनमधील आहेत. चीनचेच हाँगकाँग (८० अब्जाधीश) तिसऱ्या स्थानी आहे. शेनझेन, शांघाय आणि हांगझोऊ ही यादीतील इतर चिनी शहरे आहेत.

या यादीत मुंबई हे भारतातील एकमेव शहर असून मुंबईत ४८ जण अब्जाधीश आहेत.  यादीत आठव्या स्थानी असलेल्या मुंबईत गेल्या वर्षी १० नव्या  अब्जाधीशांची भर पडली. भारत आणि आशियातील सर्वाधिक श्रीमंत ठरलेले मुकेश अंबानी मुंबईकर असून गेल्या वर्षी त्यांची संपत्ती दुपटीने वाढून ८५ अब्ज डॉलर झाली. 

सर्वोच्च १० दहा शहरांत अमेरिकेची दोन शहरे असून भारतासह रशिया व ब्रिटन यांचे प्रत्येकी एक शहर आहे.

अब्जाधीशांचा निवास असलेली टॉप-१० शहरे 
(अब्जाधीशांची संख्या)
बीजिंग      (१००)
न्यूयॉर्क सिटी     (९९)
हाँगकाँग     (८०)
मॉस्को     (७९)
शेनझेन     (६८)
शांघाय     (६४)
लंडन     (६३)
मुंबई     (४८)
सॅनफ्रॅन्सिस्को     (४८)
हांगझोऊ     (४७)

Web Title: Beijing overtakes New York City as home to most billionaires, Mumbai behind London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.