बेनझीर भुट्टो हत्येमागे त्यांच्या पतीचाच हात!, परवेझ मुशर्रफ यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 04:44 AM2017-09-22T04:44:14+5:302017-09-22T04:45:32+5:30
माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येमागे त्यांचे पती व पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसीफ अली झरदारी यांचाच हात होता, असा खळबळजनक आरोप जनरल परवेज मुशर्रफ यांनी केला आहे.
इस्लामाबाद : माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येमागे त्यांचे पती व पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसीफ अली झरदारी यांचाच हात होता, असा खळबळजनक आरोप जनरल परवेज मुशर्रफ यांनी केला आहे.
आजारपणाच्या बहाण्याने दुबईत असलेले मुशर्रफ स्वत: बेनझीर भुट्टो खटल्यातील आरोपी असून, न्यायालयाने तीनच आठवड्यांपूर्वी ‘तेहरीक-ए-पाकिस्तान’च्या पाच संशयितांना पुराव्याअभावी निर्दोष ठरविताना मुशर्रफ यांना ‘फरार’ घोषित केले होते.
मुशर्रफ यांनी फेसबुक पेजवर टाकलेल्या व्हिडीओमध्ये हा आरोप केला आहे. बेनझीर हत्येशी झरदारी यांचाच कसा संबंध असू शकतो, याविषयी त्यांनी ‘थीअरी’ मांडली. या हत्येने सर्वांत जास्त लाभ फक्त झरदारी यांचाच झाला. ते त्यानंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्तेवर होते. त्यांनी याचा तपास का केला नाही, असा सवालही मुशर्रफ यांनी केला.
>हत्येने माझाच तोटाच
बेनझीर हत्येशी संबंध जोडणे चुकीचे व अतार्किक असून, त्यांची हत्या करून मला काय मिळणार होते, असा सवाल मुशर्रफ यांनी केला.
बैतुल्ला मेहसूद आणि त्याच्या हस्तकांनी बेनझीर यांची हत्या केली. याला सज्जड पुरावे आहेत. पण मेहसूदला सुपारी दिली कोणी? ती मी देणे शक्य नव्हते. बैतुल आणि माझे परस्परांशी हाडवैर होते. माझे सरकार बैतुलचाच काटा काढण्याच्या प्रयत्नात होते, असेही मुशर्रफ यांनी स्पष्ट केले.