बेंजामिन नेतान्याहूंनी रात्रीच्या अंधारात गाठले; इस्रायलच्या हल्ल्यात हमासचे अनेक मंत्री ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 18:23 IST2025-03-18T18:23:02+5:302025-03-18T18:23:35+5:30
इस्रायलच्या हल्ल्यात अनेक प्रमुख हमास नेत्यांचा मृत्यू झाला आहे.

बेंजामिन नेतान्याहूंनी रात्रीच्या अंधारात गाठले; इस्रायलच्या हल्ल्यात हमासचे अनेक मंत्री ठार
Israel-Hamas : एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची चिन्हे आहेत, तर दुसरीकडे इस्रायल आणि गाझामध्ये सुरू असलेले युद्ध तीव्र होत आहे. आता इस्रायलने गाझामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचे अनेक प्रमुख नेते मारले गेल्याचा दावा करण्यात येतोय. या हल्ल्यात हमास सरकारचा प्रमुख महमूद अबू वत्फा हा गृह मंत्रालयाचा महासंचालक होता. याशिवाय हमासचा राजकीय ब्युरो सदस्य अबू ओबैदा मोहम्मद अल-जमासी आणि इसाम अल-दलीस यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. हमासचा अंतर्गत सुरक्षा प्रमुख बहजत अबू सुलतान आणि न्याय मंत्रालयाचा महासंचालक अबू अमर अल-हट्टा हेदेखील या हल्ल्यांचे बळी ठरले आहेत.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायली सैन्याने गाझावरील या हल्ल्यांमध्ये 413 हून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा जीव घेतला, ज्यात मोठ्या संख्येने लहान मुलांचा समावेश आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझामधील 413 मृतांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत.
19 जानेवारीपासून युद्धविराम
हमासने इस्रायली हल्ल्यांना 19 जानेवारीपासून सुरू झालेल्या युद्धविराम कराराचे एकतर्फी उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. हमासने एक निवेदन जारी करून म्हटले की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या अतिरेकी सरकारने युद्धविराम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे गाझामधील ओलीसांचे भविष्य धोक्यात येऊ शकते.
हमासने अरब आणि इस्लामिक देशांतील लोकांना, तसेच जगभरातील लोकांना रस्त्यावर उतरून निषेध करण्याचे आवाहन केले आहे. पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद (पीआयजे) सशस्त्र गटाने देखील इस्रायलवर युद्धविराम चर्चा जाणूनबुजून मोडल्याचा आरोप केला आहे.