सर्वाधिक जागा जिंकूनही बहुमत जुळवण्यास अपयशी; इस्त्रायलमध्ये पुन्हा होणार निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 07:45 AM2019-05-31T07:45:32+5:302019-05-31T11:09:13+5:30
इतिहासात आजपर्यंत कधीही एकाच पक्षाला बहुमत मिळालेले नाही.
तेल अवीव : इस्त्रायलमध्ये यंदाच्या मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तरीही गेल्या सहा आठवड्यांत ते अन्य पक्षांसोबत आघाडी करण्यात अपयशी ठरल्याने बहुमत सिद्ध करू शकले नाहीत. यामुळे बुधवारी खासदारांनी सरकार स्थापन करण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन संसद भंग करण्याचा प्रस्ताव संमत केला. यामुळे इस्त्रायलमध्ये 17 सप्टेंबरला पुन्हा निवडणूक होणार आहे.
इस्त्रायलच्या इतिहासात आजपर्यंत कधीही एकाच पक्षाला बहुमत मिळालेले नाही. मात्र, जास्त जागा जिंकलेला पक्ष इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करत होता. यामुळे इस्त्रायलमध्ये ही पहिलीच वेळ आहे की पंतप्रधान आघाडी करण्यात अपयशी ठरले आहेत. नेतन्याहू यांनी दक्षिणपंथी पक्षांसोबत गेल्या सहा आठवड्यात अनेकदा वाटाघाटी, चर्चा केल्या. मात्र, त्यात यश न आल्याने शेवटी संसद भंगाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. उपस्थित 120 पैकी 119 खासदारांनी मतदानात भाग घेतली. यामध्ये 74 खासदारांनी संसद भंग करण्याच्या बाजुने आणि 45 जणांनी विरोधात मतदान केले.
आजपर्यंत कोणालाच बहुमत नाही
नेतन्याहू सलग पाचवेळा पंतप्रधान बनण्याच्या विक्रमावर असले तरीही या देशाने कधीच एका पक्षाला स्पष्ट बहुमताचा आकडा गाठायला दिला नाही. पुढील निवडणूक होईपर्यंत नेतन्याहूच काळजीवाहू पंतप्रधान असतील. ही निवडणूक पुन्हा मार्चमध्ये चर्चेत आलेल्या मुद्द्यांभोवतीच असणार आहे.
नेतन्याहूंना मिळालेल्या 35 जागा
नेतन्याहू यांच्या पक्षाला केवळ 35 जागा मिळाल्या होत्या. तर दुसरा पक्ष ब्लू एंड व्हाइटला 34 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्ष आघाडी करून सत्ता स्थापन करतील अशी आशा होती. मात्र, बोलणी फिस्कटल्याने देशात बहुमताचे सरकार बनले नाही.