‘स्पॉटलाईट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा आॅस्कर

By admin | Published: March 1, 2016 03:17 AM2016-03-01T03:17:39+5:302016-03-01T03:17:39+5:30

पत्रकारांची कथा सांगणाऱ्या ‘स्पॉटलाईट’ने ८८ व्या अकादमी पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मुकुट पटकावला, तर लियोनार्दो डिकॅप्रियोने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावे केला.

Best Movie Oscars for 'Spotlight' | ‘स्पॉटलाईट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा आॅस्कर

‘स्पॉटलाईट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा आॅस्कर

Next

लॉस एंजल्स : कॅथॉलिक चर्चमधील बालकांचा लैंगिक छळ उजेडात आणणाऱ्या पत्रकारांची कथा सांगणाऱ्या ‘स्पॉटलाईट’ने ८८ व्या अकादमी पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मुकुट पटकावला, तर लियोनार्दो डिकॅप्रियोने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावे केला. पुरस्कार सोहळ्यात निवेदक क्रिस रॉक याने हॉलीवूडमधील वांशिक भेदभावावर उपहासात्मक शैलीत टीका-टिपणी केली. यावर्षी जॉर्ज मिलरच्या ‘मॅड मॅक्स : फ्युरी रोड’ने तांत्रिक श्रेणीत सहा पुरस्कार पटकावून सोहळ्यावर आपली छाप उमटवली. या चित्रपटाला संकलन, निर्मिती रचना, ध्वनिसंकलन, ध्वनिमिश्रण, वेशभूषा, तसेच रंगभूषा आणि केशसज्जा श्रेणीत हे पुरस्कार मिळाले. टॉम मॅकार्थी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘स्पॉटलाईटला’ सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला, तसेच याच चित्रपटासाठी जोश सिंगर आणि मॅकार्थी यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला. दीर्घकाळापासून आॅस्कर पुरस्काराची प्रतीक्षा करीत असलेल्या डिकॅप्रियोची ही इच्छा यावेळी सुफळ झाली. त्याला‘द रेव्हनन्ट’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना डिकॅप्रियोने हवामान बदलाचा मुद्दा उपस्थित केला. डिकॅप्रियोने यावेळी दीर्घ भाषण केले. तो म्हणाला, हवामानात खरच बदल होतोय. मानवजातीला सर्वात मोठा धोका हवामान बदलाचाच असून, आम्ही सर्वांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे. मेक्सिकोचे दिग्दर्शक अ‍ॅलेजांद्रो इनारितू यांना द रेव्हनन्टसाठी सलग दुसऱ्या वर्षी आॅस्कर मिळाला. यापूर्वी त्यांना ‘बर्डमॅन’साठी आॅस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांनी पुरस्कार स्वीकारताना वैविध्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, ‘मी खूप भाग्यवान आहे. कारण, मी इथे आहे; परंतु दुर्दैवाने इतर अनेक लोक एवढे भाग्यवान नाहीत. इनारितू म्हणाले की, सर्व प्रकारच्या पूर्वग्रहांपासून स्वत:ला स्वतंत्र करण्याची आमच्या पिढीला एक चांगली संधी असून, आमच्या केसाची लांबी ज्याप्रमाणे महत्त्वाची नाही अगदी त्याचप्रमाणे आमच्या त्वचेचा रंगही महत्त्वाचा राहू नये यासाठी आम्ही प्रयत्न करायला हवेत. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट छायांकनासाठी तिसरा आॅस्कर मिळाला.
‘रूम’मधील सर्वांगसुंदर अभिनयासाठी ब्री लार्सनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री आणि सहायक अभिनेत्याचा पुरस्कार अनुक्रमे अ‍ॅलिसिया विकंदर (द डॅनिश गर्ल) आणि मार्क रेलान्स (ब्रिज आॅफ स्पाइज) यांना मिळाला. अ‍ॅडम मॅके आणि चार्ल्स रॅनडोल्फ यांना ‘बिग शार्ट’साठी रूपांतरित पटकथा श्रेणीत गौरविण्यात आले. हा चित्रपट मायकेल लुईस यांच्या पुस्तकावर आधारित आहे.
सॅम स्मिथ यांना स्पेक्टर या चित्रपटातील ‘राइटिंग्स आॅन द वॉल’ यासाठी सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपटाचा आॅस्कर ‘इनसाईड आऊट’ला मिळाला. ‘शटरर’ ला सर्वोत्कृष्ट लाईव्ह अ‍ॅक्शन लघुपट आणि ‘एक्स मशीना’ला सर्वोत्कृष्ट दृश्य परिणामाचा पुरस्कार मिळाला. या सोहळ्यात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जो बिदेनही सहभागी झाले होते.
आॅस्कर सोहळा... जल्लोष आणि रंगारंग कार्यक्रमाचे पर्व असते. कॅलिफोर्नियात पार पडलेला ८८ वा आॅस्कर सोहळा लौकिकाप्रमाणे रंगतदार ठरला. पुरस्कार विजेत्यांच्या जल्लोषाने अवघा रंगमच उत्साहाने ओथंबला होता.
2 मार्क रेलान्स, ब्री लार्सन, लिओनार्दोे डिकॅप्रिओ आणि अ‍ॅलिसा व्हिकंदर या आॅस्कर विजेत्या कलाकारांनी पत्रकारांना सामोरे जात अवघ्या जगालाही आपल्या आनंदात सहभागी करून घेतले.3 भारताच्या दृष्टीने यंदा आॅस्कर सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला. बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्राने रेड कार्पेटवर भारतीय परंपरेप्रमाणे नमस्कार करून सर्वांचे लक्ष वेधून घेत रुपेरी आणि कलाविश्वावर मोहक ठसा उमटविला.
>> प्रियंकाने केले भारताचे नेतृत्व लघुपटाचा आॅस्कर भारतीयाला
‘सन आॅफ साऊल’ला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा आॅस्कर मिळाला. भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. तथापि, अभिनेत्री प्रियंका चोप्राने आॅस्करमध्ये देशाचे नेतृत्व केले. तिने लीव श्रीबरसोबत सर्वोत्कृष्ट संकलनाचा आॅस्कर प्रदान केला. भारतीय वंशाचे ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक आसिफ कपाडिया यांना ‘एमी’साठी सर्वोत्कृष्ट लघुपटाचा आॅस्कर मिळाला. या लघुपटात गायिका एमी वाईनहाऊसचे जीवन आणि तरुणपणातील त्यांच्या मृत्यूचा आढावा घेण्यात आला आहे. पाकिस्तानी चित्रपट दिग्दर्शक शरमीन ओबैद यांना अ गर्ल इन द रिव्हर : द प्रिन्स आॅफ फरगिव्हनेससाठी दुसऱ्यांदा आॅस्कर मिळाला. त्यांना यापूर्वी अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांची कथा असलेल्या सेव्हिंग फेससाठी २०११मध्ये आॅस्कर मिळाला होता.

Web Title: Best Movie Oscars for 'Spotlight'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.