बांग्लादेशच्या जनतेसोबत गद्दारी! तीन महिन्यांचा शब्द दिलेला, पण युनुसनी निवडणुका एक वर्ष लांबणीवर टाकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:58 IST2024-12-16T12:58:03+5:302024-12-16T12:58:26+5:30
Bangladesh politics: शेख हसीना यांनी नुकतीच युनुस यांच्यावर टीका केली होती. हसीना गेल्या पाच महिन्यांपासून भारतात आश्रयाला आहेत. त्यांची सत्ता घालविण्यासाठी युनुस यांनी बांग्लादेशात तीन महिन्यांत निवडणूक घेण्याचा शब्द दिला होता.

बांग्लादेशच्या जनतेसोबत गद्दारी! तीन महिन्यांचा शब्द दिलेला, पण युनुसनी निवडणुका एक वर्ष लांबणीवर टाकल्या
बांग्लादेशमध्ये सत्तापालटानंतर हिंदूंवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनावर स्वार होत मोहम्मद युनुस यांनी सत्ता बळकावली आहे. आता त्यांना पायउतार होण्याची इच्छा नसून तीन महिन्यांत निवडणुका घेण्याचा दिलेला शब्द आता त्यांनी फिरविण्यास सुरुवात केली आहे.
शेख हसीना यांनी नुकतीच युनुस यांच्यावर टीका केली होती. हसीना गेल्या पाच महिन्यांपासून भारतात आश्रयाला आहेत. त्यांची सत्ता घालविण्यासाठी युनुस यांनी बांग्लादेशात तीन महिन्यांत निवडणूक घेण्याचा शब्द दिला होता. यानंतर हसीना यांची सत्ता गेल्यावर युनुस हेच आश्वासन देत सत्तेत आले होते. काळजीवाहू सरकार चालवत असल्याचे भासवत युनुस यांनी आता सत्ताच बळकावण्यास सुरुवात केली आहे.
तीन महिन्यांत निवडणुका घेणार असल्याचे सांगणारे युनुस पाच महिने झाले तरी निवडणुकीचे नाव काढत नव्हते. आता त्यांनी बांग्लादेशच्या विजय दिवसावेळच्या भाषणात निवडणूक कधी होणार याचा अंदाज सांगितला आहे. देशात निवडणूक ही २०२५ च्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला घेतली जाणार असल्याचे म्हटले आहे. युनुस यांच्यावर निवडणुकीची तारीख घोषित करण्याचा दबाव वाढत असताना त्यांचे वक्तव्य आले आहे.
याचाच अर्थ बांग्लादेशींना आणखी एक वर्ष निवडणुकीसाठी वाट पहावी लागणार आहे. याची घोषणा करताना युनुस यांनी एक कारण दिले आहे. निवडणुकीची तारीख ठरविण्यापूर्वी मी सुधारणांवर भर दिला आहे. जर राजकीय पक्ष या सुधारणांना राजी झाले तर निवडणुका या पुढील वर्षी नोव्हेंबरपर्यंत होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. काळजीवाहू असूनही त्यांनी आता राजकीय पक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालविण्यास सुरुवात केली आहे.