तीन मिनिटांत Zoom कॉलवर ९०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ; आता टीकेनंतर मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 11:28 AM2021-12-09T11:28:39+5:302021-12-09T11:29:03+5:30
Better.com चे सीईओ आणि संस्थापक विशाल गर्ग यांनी एका Zoom कॉलदरम्यान कर्मचाऱ्यांना दिला होता नारळ.
Better.com चे सीईओ आणि संस्थापक विशाल गर्ग यांनी एका Zoom कॉलदरम्यान कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. तसंच याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. यानंतर विशाल गर्ग यांच्यावर अनेक स्तरातून टीका करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या केलेल्या कपातीसाठी बाजार, प्रॉडक्टिव्हिटी आणि प्रॉडक्शन कारणीभूत असल्याचे विशाल गर्ग यांनी सांगितलं होतं. परंतु त्यांच्या वक्तव्यावरून झालेल्या टीकेनंतर आता त्यांनी माफी मागितली आहे.
दरम्यान गर्ग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक माफीच ईमेल केला आहे. यामध्ये आपण चुकीच्या पद्धतीनं या निर्णयाची घोषणा केल्याचं म्हटलं. हा इमेल बेटर डॉट कॉमच्या एका कर्मचाऱ्यानं लिक केला आहे. “निर्णयामुळे प्रभावित झालेल्या लोकांप्रती आणि त्यांच्या योगदानाबद्दल आपण योग्य प्रकारे आदर आणि कौतुक व्यक्त करू शकलो नाही. कर्मचारी कपात करण्याचा निर्णय आपलाच होता, पण तो जाहीर करण्याच्या पद्धतीत आपली चूक झाली,” असं त्यांनी म्हटलं आहे. मी त्यांना ज्याप्रकारे या कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं, त्यामुळे स्थिती अजून बिकट झाली आहे. मला मनापासून माफ करा,” असंही ते म्हणाले.
कोण आहेत गर्ग?
विशाल गर्ग हे बेटर.कॉम कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. ही कंपनी एक डिजिटल फर्स्ट होम ओनरशिप कंपनी आहे. गर्ग यांच्या लिंक्डइनवरील बायोडाटानुसार ते एक गुंतवणूक कंपनी वन झीरो कॅपिटलचे संस्थापक पार्टनरही आहेत. दरम्यान, विशाल गर्ग हे या वर्षाच्या सुरवातीला कोरोनाच्या साथी दरम्यान न्यूयॉर्कमधील शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधेसाठी १५ कोटी रुपयांची मदत केल्याने प्रसिद्धीच्या झोतात आले होते. या पैशांचा वापर गरीब मुलांसाठी आयपॅड, इंटरनेट, पुस्तके, ड्रेससारख्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी करण्यात आला होता.
जर तुम्ही या कॉलमध्ये असाल तर तुम्ही या दुर्दैवी ग्रुपचा एक भाग आहात, या झूम कॉलमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जात आहे, असं सांगत विशाल गर्ग यांनी ९०० कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती. दरम्यान, कंपनीने घेतलेल्या या कठोर निर्णयावर अनेकांकडून टीकाही करण्यात आली होती.