एफ-१६ विमानांच्या देखभालीसाठी अमेरिकेचे पाकला माेठे अर्थसाहाय्य, बायडेन प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 07:04 AM2022-09-09T07:04:01+5:302022-09-09T07:07:59+5:30
पाकला एफ-१६ लढावू विमानांच्या देखभालीसाठी ४५ कोटी डॉलर्सचे एफ-१६ चे भाग व संबंधित उपकरणांच्या संभाव्य परदेश लष्करी विक्रीला (एफएमएस) मंजुरी देण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकी संसदेला दिलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
वॉश्गिंटन : पाकिस्तानला एफ-१६ या लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी अमेरिकेने ४५ कोटी डॉलर्सचे (जवळपास ३५ अब्ज ८७ कोटी ६२ लाख ५० हजार रुपये) अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. पाकला दहशतवादाच्या विद्यमान व भविष्यातील धोक्यांना तोंड देता यावे यासाठी बायडेन प्रशासनाने ही मदत देऊ केली असून, गेल्या चार वर्षांत अमेरिकेकडून पाकला मिळणारे हे पहिले मोठे सुरक्षा साहाय्य आहे. पाक सरकार अफगाण तालिबान, हक्कानी नेटवर्कसह त्यांच्या आश्रय स्थळांवर कारवाई करण्यास असमर्थ ठरल्याने बायडेन यांचे पूर्वपदस्थ डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१८ मध्ये पाकचे दोन अब्ज डॉलरचे सुरक्षा साहाय्य निलंबित केले होते.
पाकला एफ-१६ लढावू विमानांच्या देखभालीसाठी ४५ कोटी डॉलर्सचे एफ-१६ चे भाग व संबंधित उपकरणांच्या संभाव्य परदेश लष्करी विक्रीला (एफएमएस) मंजुरी देण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकी संसदेला दिलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. या साहाय्यामुळे पाकची दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेची क्षमता अबाधित राखण्यास मदत होईल, असा युक्तिवाद अमेरिकेने केला आहे.
- पाकला एफ-१६ ताफ्याच्या देखभालीसाठी संभाव्य परदेश लष्करी विक्रीला (एफएमएस) मंजुरी देण्याचा आपण निर्णय घेतला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकी संसदेला दिलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. अमेरिकी संसदेला देण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार प्रस्तावित विक्रीत कोणत्याही नव्या क्षमता, शस्त्रे अगर युद्धसामग्रीचा समावेश नाही.
पाकने विमानांचा दहशतवाद्यांविरोधात वापर करावा
अमेरिकी सरकारने संसदेला प्रस्तावित विदेशी लष्करी विक्रीची माहिती दिली आहे. पाक दहशतवादविरोधी लढ्यातील महत्त्वपूर्ण साथीदार असून, पाकच्या हवाई दलाला एफ - १६ ताफ्याची देखभाल करता यावी यासाठी हे साहाय्य करण्यात येत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. पाकचा एफ-१६ कार्यक्रम अमेरिका-पाकिस्तान व्यापक द्विपक्षीय संबंधांचा महत्त्वपूर्ण भाग आहे. एफ-१६ ताफ्याद्वारे पाकला दहशतवाविरोधी मोहिमा राबविण्यास मोठी मदत मिळते. पाकने या विमानांचा वापर करून सर्व दहशतवादी संघटनांवर सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी आमची अपेक्षा आहे, असेही हा प्रवक्ता म्हणाला.
भारताचे सावध माैन
बायडेन प्रशासनाच्या निर्णयावर भारताने सावध माैन बाळगले आहे. अमेरिकेने याबाबत भारताला अधिकृतरित्या माहिती दिली अथवा नाही, याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप काेणतीही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. अमेरिकेच्या मदतीमुळे पाकिस्तानी हवाई दलाला बळकटी मिळणार असून त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये अमेरिकेने पाकला ८ एफ-१६ विमाने विकण्याच्या निर्णयाला भारताने तीव्र विराेध केला हाेता.