बायडेन यांना डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी नक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 05:56 AM2020-06-07T05:56:28+5:302020-06-07T05:56:57+5:30
अजूनही आठ राज्यांमध्ये ‘प्रायमरीज’व्हायच्या आहेत. पक्षाच्या सप्टेंबरमध्ये होणाºया राष्ट्रीय अधिवेशनात उमेदवारी जाहीर करण्याची प्रथा आहे;
वॉशिंग्टन : अमेरिकेत येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे माजी उपराष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची उमेदवारी नक्की झाली आहे. ७७ वर्षांचे बायडेन विद्यमान राष्ट्राध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध निवडणूक लढतील.
उमेदवारीच्या स्पर्धेतील तगडे प्रतिस्पर्धी बर्नी सॅण्डर्स यांनी माघार घेतली तेव्हाच बायडेन यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला होता. डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार ठरविण्यासाठी सात राज्ये आणि ‘डिस्ट्रिक्ट आॅफ कोलंबिया’मध्ये झालेल्या ‘प्रायमरीज’मध्ये मिळालेल्या मतांमुळे बायडेन यांना उमेदवारीच्या निश्चितीसाठी आवश्यक असलेले किमान १,९९१ ‘डेलिगेट््स’ मिळाल्याने त्यांची उमेदवारी नक्की झाली. अजूनही आठ राज्यांमध्ये ‘प्रायमरीज’व्हायच्या आहेत. पक्षाच्या सप्टेंबरमध्ये होणाºया राष्ट्रीय अधिवेशनात उमेदवारी जाहीर करण्याची प्रथा आहे; परंतु कोरोनामुळे अधिवेशन न झाल्यास बायडेन यांची उमेदवारी पक्ष त्याच सुमारास अधिकृतपणे जाहीर करील, अशी अपेक्षा आहे.
बायडेन काय म्हणाले?
पत्रकारांशी बोलताना बायडेन म्हणाले की, सध्याचा काळ हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ आहे. त्यावर मात करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची संतापाची व फूटपाडू धोरणे हे उत्तर नाही. देश सर्वांना बरोबर घेऊ जाऊ शकणाºया नेत्यासाठी टाहो फोडत आहे.