बायडेन - बोरिस जॉन्सन यांच्यात चर्चा; ट्रान्स-अटलांटिक संबंध वाढविण्यावर भर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 05:36 AM2021-01-25T05:36:55+5:302021-01-25T05:37:35+5:30
बायडेन यांच्याशी चर्चा केल्यानंतर खूप छान वाटले. नवीन व्यापार समझोता दोन्ही देशांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत समाविष्ट नाही
वाॅशिंग्टन/लंडन : जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यात त्यांनी युरोपीय देशांशी संबंध आणखी मजबूत करण्याचा आपला निश्चय व्यक्त केला.
बायडेन व जॉन्सन यांनी नाटो आघाडीबाबत आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. जलवायू परिवर्तनाच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी तसेच कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यावर सहमती व्यक्त केली. राष्ट्राध्यक्षपदाची बुधवारी शपथ घेतल्यानंतर बायडेन यांनी शुक्रवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो व मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस म्यॅनुएल लोपेज ओब्राडोर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी बोरिस जॉन्सन यांच्याशी चर्चा केली. बायडेन यांची ही तिसऱ्या विदेशी नेत्याशी केलेली चर्चा होती.
जॉन्सन यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, बायडेन यांच्याशी चर्चा केल्यानंतर खूप छान वाटले. नवीन व्यापार समझोता दोन्ही देशांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत समाविष्ट नाही, असे दिसत असले तरी ब्रिटिश पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान असलेल्या १०, डाऊनिंग स्ट्रीटने म्हटले आहे की, विद्यमान व्यापारी मुद्द्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, विशेष संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली. ट्रान्स-अटलांटिक संबंध वाढविण्यावरही त्यांच्यात विशेष चर्चा झाली.