बायडेन यांच्या कुत्र्याचा भल्याभल्यांना धसका!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 08:49 AM2023-10-18T08:49:45+5:302023-10-18T08:49:58+5:30
आता सिक्रेट सर्व्हिसला गप्प राहाणं शक्य नव्हतं. बायडेन यांचा जो कमांडर त्यांच्या सुरक्षा सैनिकांवरच हल्ला करतोय, तो बायडेन यांच्यावरही कधीही हल्ला करू शकेल, या भीतीनं शेवटी त्यांनी थेट बायडेन यांच्याकडेच कमांडरची तक्रार केली आणि या कमांडरची हकालपट्टी करण्याची विनंती केली!
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन हेदेखील अलीकडच्या काळात अनेक कारणांनी चर्चेत असतात. कधी त्यांच्या आजारपणामुळे, तर कधी त्यांच्यावर झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपांमुळे. त्यांचा मुलगा हंटर बायडेन याच्यावरही काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला. कारण अमली पदार्थांचं सेवन आणि बंदुकीची खरेदी! याशिवायही अनेक कारणांनी ते प्रसारमाध्यमांसाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठीही चर्चेचा विषय असतात.
आता एका नव्याच प्रकरणानं त्यांची डोकेदुखी वाढली आहे. कारण काय? - तर व्हाइट हाऊसमध्ये त्यांच्यासोबत राहाणाऱ्या त्यांच्या ‘कमांडर’नंच या वेळी त्यांना गोत्यात आणलं! अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हटल्यावर त्यांच्यासाठीची सुरक्षा किती कडेकोट असणार, हे तर ओघानं आलंच. असं म्हटलं जातं, की अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या जवळ साधी मुंगीही फिरकू शकणार नाही, इतका कडक बंदोबस्त त्यांच्या सुरक्षेसाठी केलेला असतो. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सिक्रेट सर्व्हिसच्या स्टाफवर असते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की ज्यांच्यावर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची प्रमुख जबाबदारी त्या सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सवरच हल्ले होऊ लागले. आणि हे हल्ले कोणी करावेत? - तर तेही बायडेन यांच्यासोबत त्यांच्याच घरात राहाणाऱ्या त्यांंच्या ‘कमांडर’नं! करणार काय? सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सना याबाबत बोलायचीही चोरी! तोंड दाबून बुक्क्यांचा मार! तक्रार तरी कुणाकडे करणार? कोणी सुरक्षा सैनिक या कमांडरच्या आसपास आला की तो लगेच त्याच्यावर हल्ला करायचा आणि त्याचा कडकडून चावा घ्यायचा! एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तब्बल अकरा वेळा बायडेन यांच्या कमांडरनं आपल्याच लोकांवर असे हल्ले केले!
आता सिक्रेट सर्व्हिसला गप्प राहाणं शक्य नव्हतं. बायडेन यांचा जो कमांडर त्यांच्या सुरक्षा सैनिकांवरच हल्ला करतोय, तो बायडेन यांच्यावरही कधीही हल्ला करू शकेल, या भीतीनं शेवटी त्यांनी थेट बायडेन यांच्याकडेच कमांडरची तक्रार केली आणि या कमांडरची हकालपट्टी करण्याची विनंती केली! एव्हाना माध्यमांमध्येही यासंदर्भातल्या बातम्या यायला लागल्या होत्या. प्रकरण आणखी गंभीर होऊ नये म्हणून बायडेन यांनाही नाईलाजानं का होईना, या कमांडरची व्हाइट हाऊसमधून हकालपट्टी करावीच लागली. त्याची रवानगी कुठे करण्यात आली, ही बाब मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.
बायडेन यांच्या पत्नी जिल यांची प्रवक्ता एलिझाबेथ अलेक्झांडर यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. पण मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे या कमांडरचा. त्याच्याविषयी इतक्या तक्रारी असूनही आणि आपल्याच सुरक्षारक्षकांवर त्यानं हल्ले केल्यानंतरही बायडेन त्याला ‘पाठीशी’ का घालत होते किंवा या बाबीकडे दुर्लक्ष का करीत होते? कारण हा ‘कमांडर’ म्हणजे बायडेन यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला कोणी अधिकारी नव्हता, तर तो त्यांचा आवडता कुत्रा होता : याच कुत्र्यानं आजवर अनेकदा सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सवरही हल्ले केले होते, त्यांना चावे घेतले हाेते!
जर्मन शेफर्ड जातीचा त्यांचा हा कुत्रा आहे दोन वर्षांचा. कमांडरच्या आधीही बायडेन यांच्याकडे आणखी एक जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा होता. त्याचं नाव होतं ‘मेजर’. पण या मेजरनंही सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनाच टार्गेट केल्यामुळे त्याचीही तेथून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आलेल्या ‘कमांडर’नंही ‘मेजर’चाच कित्ता गिरवल्यानं सिक्रेट सर्व्हिससाठी ती मोठी डोकेदुखी झाली होती. गेल्या वर्षभरापासूनच कमांडरविषयी तक्रारी वाढू लागल्यानं बायडेन यांना त्याची दखल घ्यावी लागली आणि त्याच्या हकालपट्टीचा निर्णय त्यांना घ्यावा लागला! व्हाइट हाऊसमधून त्याला काढण्याआधी खास त्याच्यासाठी तेथेच एक वेगळं ‘प्लेग्राऊंड’ ट्रेनिंग सेंटर तयार करण्यात आलं होतं. बायडेन यांचे बंधू जेम्स यांनी डिसेंबर २०२१ मध्ये ‘कमांडर’ बायडेन यांना गिफ्ट दिला होता!
‘डेलीमेल’ या नियतकालिकानं यासंदर्भात आपल्या वेबसाइटवर म्हटलं आहे, कमांडरनं सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सवर हल्ले केल्यानंतर व्हाइट हाऊसच्या स्टाफला चावे घेतले होते. मात्र बायडेन यांच्या पत्नी जिल यांच्या कार्यालयाच्या म्हणण्यानुसार ही बाब चुकीची आहे. कमांडर व्हाइट हाऊसच्या ग्राऊंडकिपरसोबत फक्त खेळत होता! मात्र त्यासंदर्भाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र कमांडरवर कारवाई करण्यात आली!
चार राष्ट्राध्यक्षांची हत्या!
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा अत्यंत कडक असली तरी आजपर्यंत त्यांच्या चार राष्ट्राध्यक्षांची हत्या झाली आहे. १८६५मध्ये अब्राहम लिंकन, १८८१मध्ये जेम्स गारफिल्ड, १९०१मध्ये विल्यम मॅकॅन्ली आणि १९६३ मध्ये जॉन एफ. केनेडी! त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सिक्रेट सर्व्हिसवर असल्यानं आता त्यांना कोणताच धोका पत्करायचा नव्हता, त्यामुळेच त्यांनी कमांडरची हकालपट्टी केली!