मोठी दुर्घटना टळली! दिल्लीहून दोहाकडे निघालेल्या विमानाचं कराचीत इमर्जन्सी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 02:15 PM2022-03-21T14:15:09+5:302022-03-21T14:25:55+5:30
Emergency Landing : इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार, फ्लाइट QR579ने सोमवारी पहाटे 3.20 वाजता (भारतीय वेळेनुसार) दिल्लीहून उड्डाण केले आणि पहाटे 5.30 वाजता कराची येथे उतरले.
कतार एअरवेजच्या दिल्लीहून दोहाकडे जाणाऱ्या QR579 या विमानाचं पाकिस्तानातील कराची विमानतळावर (जिन्ना इंटरनॅशनल एअरपोर्ट) इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आलं. विमानातील कार्गो होल्ड भागात धूर असल्याचे सिग्नल मिळाल्याने विमान कराची विमानतळावर उतरवण्यात आलं. या विमानात २८३ प्रवासी होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार, फ्लाइट QR579ने सोमवारी पहाटे 3.20 वाजता (भारतीय वेळेनुसार) दिल्लीहून उड्डाण केले आणि पहाटे 5.30 वाजता कराची येथे उतरले.
"विमान कराची येथे आपत्कालीन सेवांद्वारे सुरक्षितपणे उतरले आणि प्रवाशांना पायऱ्यांद्वारे व्यवस्थित खाली उतरवले," असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे.
"सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे आणि प्रवाशांना दोहा येथे नेण्यासाठी उड्डाणाची व्यवस्था केली जात आहे," एअरलाइनने पुढे निवेदनात असं नमूद केलं आहे. सीएएच्या प्रवक्त्याने सांगितले की "जिना आंतरराष्ट्रीय विमानतळवरील सर्व फ्लाईट्स ऑपरेशन्स सुरळीत सुरु आहेत".
या घटनेबाबत कतार एअरवेजच्या वतीने निवेदन जारी करण्यात आलं आहे. एअरवेजकडून सांगण्यात आलं की, विमानाची तपासणी केली जात आहे, त्याचप्रमाणे प्रवाशांना दुसऱ्या विमानाने दोहा येथे नेण्याची व्यवस्था केली जात आहे. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल एअरवेजने माफी मागितली आहे.