मोठी दुर्घटना! 5800 गायी घेऊन जाणारे जहाज बुडाले; 43 कर्मचाऱ्यांपैकी 1 जण वाचला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 04:11 PM2020-09-03T16:11:51+5:302020-09-03T16:13:19+5:30
जपानच्या या भागात मेसक चक्रीवादळ सुरु होते. यामुळे हवामान खराब होते. या जहाजावरून केवळ एवढाच संदेश प्राप्त झाला होता.
टोकिओ : जपानच्या दक्षिणेकडे 5800 गायी घेऊन जाणाऱ्या जहाजाला आज जलसमाधी मिळाली. या जहाजावर 43 कर्मचारी होते. जहाजावरून बेपत्ता होण्याच्या आधी खराब हवामानाच्या संकटात अडकल्याचा संदेश पाठविण्यात आला होता. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी रात्री उशिराने जहाजावरील एका कर्मचाऱ्याला पाण्यातून वाचविण्यात आले.
हा कर्मचारी चालण्यासाठी सक्षम असून त्याची प्रकृतीही चांगली आहे. तो फिलिपिन्सचा नागरिक आहे. जहाजावरून संदेश आल्यानंतर जपानच्या तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर त्या दिशेने रवाना झाले. तेव्हा हेलिकॉप्टरमधील अधिकाऱ्यांना समुद्रात लाईफ जॅकेट घालून गटांगळ्या खात असलेला एक व्यक्ती वाचण्यासाठी धडपड करत आहे. गल्फ लाईवस्टॉक 1 या जहाजाने बुधवारी पहाचेच्या सुमारास हा संदेश पाठविला होता. या जहाजाचे वजन जवळपास 11,947 टन होते. यामध्ये 5800 गायी होत्या. हे जहाज पूर्व चीन समुद्राच्या अमामी ओशिमाच्या तटाजवळून जात होते.
या भागात मेसक चक्रीवादळ सुरु होते. यामुळे हवामान खराब होते. या जहाजावरून केवळ एवढाच संदेश प्राप्त झाला होता. मात्र, जहाजामध्ये काय बिघाड झाला, याबाबत काहीही समजू शकले नाही. जहाजामध्ये 38 जण फिलिपाईन्स, दोन न्युझीलंड आणि एक ऑस्ट्रेलियाचे कर्मचारी होते. इतरांना वाचविण्यासाठी जपानच्या नौदलाकडून शोध सुरु असून यामध्ये पाच विमाने आणि पाणबुड्यांना सहभागी करण्यात आले आहे.