चीनला मोठा झटका! तैवान १ लाख भारतीयांना नोकरी देण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 03:35 PM2023-11-11T15:35:59+5:302023-11-11T15:36:47+5:30
तैवान आणि भारत यांच्या मैत्रीत एक नवा अध्याय जोडला जाणार आहे.
तैवान आणि भारत यांच्या मैत्रीत एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, तैवान भारतातील सुमारे एक लाख लोकांना नोकरी देणार आहे. हे लोक तैवानच्या फॅक्ट्री, शेतात आणि हॉस्पिटलमध्ये काम करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये या संदर्भात दोन्ही देशांमध्ये करार होऊ शकतो. हा करार झाला तर ही बाब चीनच्या पचनी पडणे कठीण होईल. अलीकडच्या काळात, चीनची अर्थव्यवस्था अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे, तर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.
तैवानमध्ये वृद्धांची संख्या सातत्यानं वाढत आहे. तेथे कामगारांची नितांत गरज आहे. दुसरीकडे, भारतात लोकसंख्येनुसार नोकऱ्या निर्माण होत नाहीत. २०२५ पर्यंत तैवान एक सुपर एज्ड सोसायटी बनेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तेथील लोकसंख्येतील वृद्धांची संख्या २० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मात्र भारत आणि तैवान यांच्यातील करारामुळे चीनसोबतचा तणाव वाढणार हे नक्की. चीन तैवानला आपला भाग मानतो आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून तणाव आहे. तैवानशी कोणत्याही देशाचे आर्थिक संबंध असावेत असं चीनला वाटत नाही. तर दुसरीकडे चीनचा सीमेवरून भारतासोबत आधीच वाद सुरू आहे.
तैवानची अर्थव्यवस्था
भारत-तैवान यांच्यातील करार अंतिम टप्प्यात असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितलं. या संदर्भात तैवानच्या कामगार मंत्रालयानं या करारावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. जे आपल्याला सहकार्य करतील आणि लेबर पुरवतील त्यांचं आम्ही स्वागत करतो असं तैवानचं म्हणणं आहे. तैवानला जाऊ इच्छिणाऱ्या भारतातील लोकांचं हेल्थ सर्टिफाईड करण्याच्या यंत्रणेवर काम सुरू असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. तैवानमधील बेरोजगारीचा दर २००० नंतरच्या सर्वात नीचांकी पातळीवर आहे. तैवानची अर्थव्यवस्था ७९० अब्ज डॉलर्सची आहे आणि ती टिकवण्यासाठी देशाला लेबर्सची गरज आहे.