पाकिस्तानी एअरफोर्सला मोठा झटका; एअरबेसवरील हल्ल्यात ३५ सैनिकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 01:19 PM2023-11-07T13:19:27+5:302023-11-07T13:21:39+5:30
पाकिस्तानने चीनसारखीच माहिती लपविली; पाकिस्तानी सैन्याला आता राजकारणातून लक्ष काढून घेऊन आतील समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आल्याचे जाणकार म्हणत आहेत.
रावळपिंडी : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या हवाई दलाच्या तळावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. य़ावर पाकिस्तानने जसे चीन करते तशा बऱ्याच गोष्टी लपविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू, हळूहळू पाकिस्तानला झालेल्या नुकसानीची माहिती समोर येऊ लागली आहे. पंजाबच्या मियांवाली एअरबेसवरील हल्ल्यात पाकिस्तानला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसला आहे.
पाकिस्तानी सैन्याला आता राजकारणातून लक्ष काढून घेऊन आतील समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आल्याचे जाणकार म्हणत आहेत. परवाच्या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
3 नोव्हेंबर रोजी मियांवली एअरबेसवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानी हवाई दलाची 14 विमाने नष्ट झाली होती आणि 35 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांना दहशतवादापासून मुक्ती मिळाल्याचा गैरसमज होता, असे लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये वॉर स्टडीज डिपार्टमेंटमध्ये वरिष्ठ फेलो म्हणून पोस्ट केलेल्या आयशा सिद्दीका यांनी म्हटले आहे.
या हल्ल्याद्वारे दहशतवाद्यांनी पाकिस्तानी हवाई दलाचे प्रशिक्षण केंद्र हे सर्वात कठीण लक्ष्य काबीज करण्याची क्षमता दाखविण्याचा प्रयत्न केला होता. या द्वारे पाकिस्तानी लष्कराचे डोळे उघडले असे त्यांनी द प्रिंटमध्ये छापलेल्या लेखात म्हटले आहे.
तहरीक-ए-जिहाद पाकिस्तान (TJP) या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) शी संलग्न संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 2009 मध्ये आर्मी जनरल हेडक्वार्टर (GHQ), 2011 मध्ये मेहरान नेव्हल एअर बेस, 2012 मध्ये मिन्हास एअर बेस आणि 2015 मध्ये बदाबेर नॉन-फ्लाइंग एअर बेस या ठिकाणी हल्ले केले होते.