कोरोनाचे रुग्ण वाढत असताना चीनने उचललं 'असं' पाऊल; 'या' देशातील जनता संतापली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 07:27 PM2022-08-22T19:27:55+5:302022-08-22T19:37:33+5:30
चीनने सीमा सील केल्यानंतर आता नेपाळच्या अनेक व्यापाऱ्यांनी कोलकाता सीमेवरून नेपाळमध्ये माल आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरस संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे चीननेनेपाळ (चीन-नेपाळ सीमा) लगतच्या आपल्या भागात लॉकडाऊन लागू केला आहे. या कारवाईअंतर्गत नेपाळला लागून असलेले रसुवागढी आणि तोतापानी सीमारेषा सील करण्यात आली आहे. त्यामुळे नेपाळमधील शेकडो कंटेनर चीनमध्ये अडकले आहेत. चीनच्या या निर्णयावर नेपाळच्या व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. चीनने या महिन्याच्या 10 ऑगस्टपासून तोतापानी बॉर्डर पॉईंट आणि 14 ऑगस्टपासून रसुवागढी बॉर्डर पॉईंट व्यवसायासाठी बंद केला आहे. व्यापाऱ्यांमध्ये वाढत्या नाराजीमुळे नेपाळचे परराष्ट्र मंत्री नारायण खडका यांनी चीनला लागून असलेल्या भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
नेपाळमधील सणांमुळे नेपाळी व्यापाऱ्यांनी चीनमधून कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फुटवेअर आणि खाद्यपदार्थांसह मोठ्या प्रमाणात वस्तू मागवल्या आहेत. नेपाळी व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चीनने कोविडच्या नावाने सीमा सील केल्या आहे. त्यामुळे नेपाळमधील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एका अहवालानुसार, नेपाळी व्यापाऱ्यांचे 300 हून अधिक कंटेनर या दोन सीमेवर अडकले आहेत. नेपाळचे व्यापारी वर्षभर या सणांची वाट पाहत असतात कारण त्या दरम्यान त्यांना चांगला पैसा मिळतो. चीनच्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे नेपाळमधील अनेक व्यापारी दु:खी आहेत.
चीनने सीमा सील केल्यानंतर आता नेपाळच्या अनेक व्यापाऱ्यांनी कोलकाता सीमेवरून नेपाळमध्ये माल आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ते कोलकाता बंदरातून नेपाळमध्ये आणण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. नेपाळी लोकांचे म्हणणे आहे की जर चीनने त्यांना आधीच सांगितले असते की ते दोघेही व्यापारी सीमा सील करणार आहेत, तर त्यांनी कोलकाता बंदरातून आयात केलेला कंटेनर मिळाला असता. चीनच्या बाजूने नेपाळचे किती कंटेनर अडकले आहेत याची अधिकृत आकडेवारी नेपाळ सरकारकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.
चीनकडून रसुवागढी आणि तोतापानी सीमारेषा सील करण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी अनेकदा चिनी अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आहे. चीनचे म्हणणे आहे की कोविडची प्रकरणे कमी होताच हे पुन्हा सुरू होईल. नेपाळ सरकारच्या अहवालानुसार, नेपाळ आणि चीनमधील व्यापार मजबूत झाला आहे आणि गेल्या एका वर्षात 13.19 टक्के वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.