सौदी अरेबियाने 14 देशांसाठी व्हिसा नियम बदलला; हजसाठी जाणाऱ्या भारतीय मुस्लिमांवरही होणार परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 21:04 IST2025-02-10T21:03:31+5:302025-02-10T21:04:30+5:30
सौदी अरेबिया हज आणि उमराहच्या पार्श्वभूमीवर आपल्या नियमांमध्ये नेहमीच बदल करत असतो...

सौदी अरेबियाने 14 देशांसाठी व्हिसा नियम बदलला; हजसाठी जाणाऱ्या भारतीय मुस्लिमांवरही होणार परिणाम
सौदी अरेबियाने यावेळी हजसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाच्या या नव्या निर्णयानुसार, आता हजमध्ये मुलांच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. हज दरम्यान दरवर्षी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करता, त्यांना हज करण्यापासून रोखण्यात आले आहे, असे सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने म्हटले आहे.
पहिल्यांदा हजसाठी येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार -
सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने म्हटले आहे की, "2025 मध्ये पहिल्यांदाच हजसाठी येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, गर्दीमध्ये होणाऱ्या त्रासामुळेच मुलांनावरही बंदी घालण्यात आली आहे. हज 2025 साठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे." सौदी अरेबियाचे नागरिक आणि तेथे राहणारे लोक Nusuk app च्या माध्यमाने अथवा ऑफिशियल ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमाने नोंदणी करू शकतात.
भारतासह या देशांवर होणार परिणाम -
सौदी अरेबियाच्या या नव्या व्हिसा नियमांमुळे, अल्जेरिया, बांगलादेश, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, इराक, जॉर्डन, मोरोक्को, नायजेरिया, पाकिस्तान, सुदान, ट्युनिशिया आणि येमेन या देशांवर परिणाम होईल.
या देशांतील लोक केवळ सिंगल एंट्री व्हिसासाठीच करू शकतात अर्ज -
सौदी अरेबिया सरकारने या देशांसोबत पर्यटन, व्यवसाय आणि कौटुंबिक प्रवासासाठी एका वर्षाचा मल्टिपल एंट्री व्हिसा अनिश्चित काळासाठी निलंबित केला आहे. नवीन नियमांनुसार, या देशांतील लोक केवळ सिंगल एंट्री व्हिसासाठीच अर्ज करू शकतात, जो ३० दिवसांसाठी वैध असेल. महत्वाचे म्हणजे, सौदी अरेबिया हज आणि उमराहच्या पार्श्वभूमीवर आपल्या नियमांमध्ये नेहमीच बदल करत असतो.