Big News : सूर्यावरील सूक्ष्म विस्फोटांचा लागला शोध; पुण्यातील टाटा इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांना जागतिक पातळीवरचं यश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 09:07 PM2020-06-02T21:07:17+5:302020-06-02T21:08:48+5:30
संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी प्रथमच जगासमोर चुंबकीय विस्फोटाचे धूम्र लोट आढळून येत असल्याचे पुरावे मांडले आहे...
पुणे: पुण्यातील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (एनसीआरए- टीआयएफआर)च्या नॅशनल सेंटर फॉर स्ट्रोफिजिक्समधील वैज्ञानिकांनी सूर्याच्या सर्व भागांवर होणाऱ्या छोट्या विस्फोटातून निघणाऱ्या सूक्ष्म रेडिओ प्रकाशझोतांचा शोध लावला आहे. या संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी प्रथमच जगासमोर चुंबकीय विस्फोटाचे धूम्र लोट आढळून येत असल्याचे पुरावे मांडले आहे.
''एनसीआरए मधील प्रा.दिव्य ओबेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत असलेला विद्यार्थी सुरजित मोंडल व डॉ. अतुल मोहन या शास्त्रज्ञांच्या गटाने हे संशोधन केले आहे. ‘मर्चीसन वाइल्ड फिल्ड रे (एमडब्ल्यूए)’या दुर्बिणीतून घेतलेल्या डाटा व एनसीआरए मध्ये तयार केलेल्या आधुनिक तांत्रिक प्रणालीच्या सहाय्याने हा शोध लावला आहे''. सूर्याच्या पृष्ठभागावर अंदाजे दोन दशलक्ष अंश तापमानाचा म्हणजेच सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा ३०० पट जास्त उष्ण वायूचा एक थर असतो.या थराची झलक संपूर्ण खग्रास सूर्यग्रहणादरम्यान आपल्याला पाहता येते.त्यालाच करोना म्हणतात. करोना तापवणारी अतिरिक्त ऊर्जा सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रातून येत असावी. परंतु,हे कसे घडते याबाबत अद्याप माहीत नव्हते.
दिव्य ओबेरॉय म्हणाले, अत्याधुनिक उपकरणे आणि गेल्या काही वर्षांपासून आम्ही विकसित केलेले अत्यंत संवेदनशील सौर रेडिओ प्रतिमा बनवण्याचे तंत्र यामुळे हे संशोधन शक्य झाले. आम्ही शोधून काढले अत्यंत कमकुवत रेडिओ फ्लॅश हे आत्तापर्यंत निदर्शनास आलेल्या दुर्बल स्फोटांपेक्षा सुमारे शंभर पट कमकुवत आहेत.