Panjshir Valley: युक्रेनची सीमा धगधगत असताना पंजशीरमधून मोठी बातमी; पाकिस्तानच्या एन्ट्रीमुळे पुन्हा लढाई सुरु झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 10:48 PM2022-02-17T22:48:58+5:302022-02-17T22:49:23+5:30
Panjshir Valley War Started: अद्याप संपूर्ण परिसर तालिबानच्या ताब्यात गेलेला नाही. यामुळे हा पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबान जोरदार प्रयत्न करत आहे. अलीकडेच पंजशीरमध्ये स्थानिक लोक आणि तालिबानी लढवय्यांमधील रक्तरंजित संघर्षाचा नवा वाद समोर आल्यानंतर पुन्हा एकदा लढाई सुरू झाली आहे.
एकीकडे रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर कधीही युद्ध भडकण्याची चिन्हे असताना रशियादेखील जिंकू न शकलेल्या पंजशीर घाटीतून मोठी बातमी येत आहे.अफगानिस्तानच्या निर्वासित सरकारचे काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित करणाऱ्या अमरुल्ला सालेह यांनी पंजशीर घाटीत काहीतरी मोठे घडत असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानचे अनेक स्नायपर्स त्यांच्या अधिकाऱ्यांसह पंजशीर घाटीत घुसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अफगानिस्तानमध्ये पंजशीर हा असा एकमेव भाग होता जो रशियाला देखील जिंकता आला नव्हता. त्यावर आता हक्कानी गट आणि तालिबानने ताबा मिळविला आहे. बुधवारी याच हक्कानी गटाच्या शेकडो दहशतवाद्यांसोबत डझनावर पाकिस्तानी स्नायपर्स आणि त्यांचा अधिकारी पंजशीर घाटीत आल्याचा दावा सालेह यांनी केला आहे. पंजशीर घाटीमध्ये पाकिस्तानी तंबू आणि अन्न धान्याशी संबंधीत साहित्य दिसले आहे. याबाबत लवकरच पुरावे दिले जातील, असेही सालेह म्हणाले.
या आठवड्याच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते सालेह यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांचे मुखपत्र म्हणून काम केल्याबद्दल निशाणा साधला. आयएसआय कट्टरपंथी दहशतवादी संघटनेला गुप्तचर माहिती पुरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अद्याप संपूर्ण परिसर तालिबानच्या ताब्यात गेलेला नाही. यामुळे हा पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबान जोरदार प्रयत्न करत आहे. अलीकडेच पंजशीरमध्ये स्थानिक लोक आणि तालिबानी लढवय्यांमधील रक्तरंजित संघर्षाचा नवा वाद समोर आल्यानंतर पुन्हा एकदा लढाई सुरू झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तालिबानने अफगाणिस्तानच्या पंजशीर प्रांतातील परंध खोऱ्याला वेढा घातला असून तेथे राहणाऱ्या अनेक लोकांना ताब्यात घेतले आहे. पंजशीरमध्ये तालिबानी वाहनाचा स्फोट झाल्यानंतर स्थानिक लोक आणि तालिबान यांच्यात संघर्ष सुरू झाला. ७ फेब्रुवारीपासून खोऱ्यात संघर्ष सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.तालिबानने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथील लोकांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्याचबरोबर अडचणी असतानाही पंजशीरची जनता लढत आहे.