मोठी बातमी! तैवाननं चीनचं सुखोई विमान पाडलं, जखमी वैमानिकाला घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 01:33 PM2020-09-04T13:33:53+5:302020-09-04T13:34:39+5:30
चिनी विमानाने तैवानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला होता.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सच्या लढाऊ विमान सुखोईला पाडल्याचा दावा तैवानने शुक्रवारी केला आहे. चिनी विमानाने तैवानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर तैवाननं ते विमान पाडलं, या घटनेत पायलट जखमी झाला असून, त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. एक व्हिडीओसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तैवानने या हल्ल्यासाठी अमेरिकेच्या पेट्रियाट मिसाईल डिफेन्स सिस्टमचा उपयोग केल्याची चर्चा आहे.
तैवानने चिनी विमानाला अनेकदा इशारा दिला. मात्र त्यानंतरही चीनचं लढाऊ विमान तैवानच्या हद्दीत आल्याने तैवानने कारवाई केली. या हल्ल्यात चीनच्या लढाऊ विमानातील वैमानिक जखमी झाला आहे, असंही सांगण्यात येत आहे. जर ही घटना घडली असेल तर येणाऱ्या काळात या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. चीनकडून होणाऱ्या कोणत्याही आक्रमक कृतीचा सामना करण्यासाठी तैवानने आपल्या हवाई दल आणि नौदलाला सतर्कतेचा इशारा दिला.
तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांनी तैवानचं सैन्य दल आणखी शक्तिशाली करण्यासाठी राखीव सैन्य दलांना अधिक मजबूत करण्याची घोषणा केली. तैवानच्या सैन्याच्या मदतीला राखीव दलांना सज्ज केलं जात आहे. हे राखीव दलदेखील इतर नियमित दलांप्रमाणेच शस्त्रांनी सुसज्ज असतील. त्यांच्याकडे तैवान सैन्यातील जवानांकडे असलेल्या सर्व शस्त्रांची कुमक पुरवली जाणार आहे.दरम्यान, चीनने मागील काही दिवसांमध्ये तैवानच्या हवाई क्षेत्रात आपली लढाऊ विमानं पाठवण्यास सुरुवात केली आहे.