Kabul Blast: काबुल विमानतळ स्फोटात मोठा खुलासा, हल्ल्याच्या सूत्रधाराचे पाकिस्तानशी संबंध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 04:02 PM2021-08-27T16:02:53+5:302021-08-27T16:04:42+5:30
Kabul Serial Blast: काबुलमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खुरासान प्रोविंस (IS-KP) ने घेतली आहे.
काबुल:अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये गुरुवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात अनेकांनी आपला जीव गमावलाय. मीडिया रिपोर्टनुसार, काबुल विमानतळावरील स्फोटातील मृतांचा आकडा 100 च्या पुढे गेला असून, यात 13 अमेरिकन सैनिकांचा समावेश आहे. दरम्यान, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट खुरासर प्रोविंस (IS_KP) नं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून, या संघटनेच्या प्रमुखासंबंधी एक मोठा खुलासा झाला आहे.
इस्लामिक स्टेट खुरासान प्रोविंस (IS-KP) प्रमुख मावलावी अब्दुल्ला उर्फ अस्लम फारुकी याच्या आदेशावरुनचा हा हल्ला करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अस्लम फारुकीचे यापूर्वी लष्कर-ए-तैयबाशी संबंध होते. यानेच हक्कानी नेटवर्कच्या साथीनं काबुल आणि जलालाबादममध्ये अनेक हल्ले घडवून आणले आहेत. फारुकीचा तहरीक-ए-तालिबानपाकिस्तानशीही संबंध असल्याची माहिती आहे.
गुरुद्वारावरील हल्ल्यात सहभाग
अस्लम फारुकी हा एक पाकिस्तानी आहे. त्याला गेल्या वर्षी एप्रिल 2020 मध्ये अफगाण नॅशनल सिक्योरिटी डायरेक्टरेट (NDS) नं नांगरहार प्रांतातून अटक केली होती. अस्लम फारुकी गेल्या वर्षी काबुलमधील गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याच्या कटात सहभागी होता. त्या हल्ल्यात 25 जणांना जीव गमवावा लागला होता. हक्कानी नेटवर्कच्या मदतीने केलेल्या या हल्ल्यात भारतीय राजदूत निशाण्यावर होते. असलम फारुकीनं केरळचा रहिवासी असलेल्या ISIS चा दहशतवादी मुहसिन तिकरीपुरकडून आत्मघाती हल्ला घडवून आला होता.
पाकिस्ताननं अस्लम फारुकीला वाचवण्याचा प्रयत्न केला
गेल्या वर्षी IS-KP प्रमुख अस्लम फारुकीला अटक करण्यात आली तेव्हा पाकिस्ताननं अस्लमची कोठडी मागितली होती. अस्लम फारुकीनं पाकिस्तानी एजन्सींशी असलेले संबंध उघड केले तर पाकिस्तान उघडा होईल अशी भीती पाकिस्तानला होती. पण, अफगाणिस्तान सरकारनं अस्लम फारुकीची कोठडी देण्यास नकार दिला होता. पण, काबुलवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबाननं असलम फारुकीची बगराम तुरुंगातील सुटका केली. सुटका होताच त्यानं काबुलमध्ये हे एका पाठोपाठ एक असे तीन हल्ले घडवू आणले.