ट्रम्प यांचं Twitter अकाऊंट बंद करण्यामागे भारतीय वंशाच्या 'या' महिलेची मोठी भूमिका
By जयदीप दाभोळकर | Published: January 11, 2021 01:30 PM2021-01-11T13:30:51+5:302021-01-11T13:34:30+5:30
ट्रम्प समर्थकांच्या संसद इमारतीतील हिंसाचारानंतर ट्रम्प यांचं ट्विटर खातं करण्यात आलं बंद
अमेरिकेच्या संसदेच्या इमारतीत ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच याची चर्चाही सुरू आहे. परंतु जगातील सर्वात ताकदवान देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याच्या निर्णयामागे एका भारतीय वंशाच्या महिलेची महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. विजया गड्डे असं त्यांचं नाव असून त्या ट्विटरमध्ये मोठ्या पदावरही कार्यरत आहेत.
अमेरिकेची संसद असलेल्या ‘कॅपिटल’ इमारतीवर मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हल्ला चढविल्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई करण्याबाबत विचार सुरू आहे. ट्विटरने भविष्यातही ट्रम्प यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्यं, दंगली केल्या जाण्याची शक्यता व्यक्त करत त्यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे. ट्रम्प यांचं ट्विटर खातं बंद करण्यामागे विजया गड्डे यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्या ट्विटरच्या पॉलिसी, ट्रस्ट आणि सुरक्षा प्रकरणांच्या प्रमुख आहेत. पुन्हा हिंसाचारासारखे प्रकार नाकारता येत नाहीत त्यामुळे ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विजया गड्डे यांनी आपल्या कंपनीच्या धोरणांबद्दल माहिती प्रकाशित केली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी एक लिंकही दिली असून त्यावर अधिक माहिती दिली असल्याचंही म्हटलं आहे.
The account of @realDonaldTrump has been permanently suspended from Twitter due to the risk of further violence. We've also published our policy enforcement analysis - you can read more about our decision here: https://t.co/fhjXkxdEcw
— Vijaya Gadde (@vijaya) January 8, 2021
कोण आहेत विजया गड्डे ?
विजया गड्डे या टेक्सासमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. टेक्सास हा ट्रम्प यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांचे वडील गल्फ ऑफ मेक्सिकोच्या तेल शुद्धकरण कंपनीत केमिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. विजया गड्डे यांचं पुढील शिक्षण न्यूजर्सीत झालं. कॉर्नेल विद्यापीठ आणि न्यू यॉर्क लॉ विद्यापीठातून आपलं कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या गड्डे यांनी जवळपास १० वर्षे निरनिराळ्या कंपन्यांसोबत काम केलं. २०११ मध्ये त्या ट्विटरशी जोडल्या गेल्या. तसंच ट्विटरची धोरणं आणि त्यांच्यासंबंधी निर्णय घेण्याचं काम हे गड्डे अनेक वर्षांपासून करत आहेत. ट्विटरच्या जागतिक पातळीवरील धोरणं ठरवण्यातही त्यांची मोलाची भूमिका आहे.
यापूर्वी ओव्हल कार्यालयात गड्डे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांच्यासोबत ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यानंतर जॅक डॉर्सी यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेतली होती. त्यावेळीही विजया गड्डे या त्या ठिकाणी उपस्थित होत्या.