पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का! निवडणूक आयोगाने रद्द केली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 10:09 PM2023-12-30T22:09:09+5:302023-12-30T22:09:46+5:30
पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला होणार सार्वत्रिक निवडणुका
Imran Khan, Pakistan Elections: पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने शनिवारी माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान यांचे २०२४ च्या राष्ट्रीय निवडणुका लढवण्यासाठी केलेले नामांकन नाकारले. माजी पंतप्रधानांनी २०२४ची राष्ट्रीय निवडणूक लढवण्यासाठी त्यांचे मूळ गाव मियांवली येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने सांगितले की, खान यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला, कारण ते मतदारसंघात नोंदणीकृत मतदार नव्हते. त्यांना न्यायालयाने दोषी ठरवून अपात्र ठरवले आहे. यादरम्यान, इम्रान खानच्या मीडिया टीमनेही पुष्टी केली की आयोगाने त्यांचा मियांवलीमधून निवडणूक लढवण्याचा अर्जही नाकारला आहे. यासोबतच लोहारमधून त्यांचा उमेदवारी अर्जही फेटाळण्यात आला आहे.
इम्रान खान सायफर प्रकरणात या वर्षी ऑगस्टपासून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर गोपनीय कागदपत्रे लीक केल्याचा आरोप होता. पीटीआयच्या प्रमुखाने मार्चमध्ये पाकिस्तानच्या वॉशिंग्टन दूतावासाने पाठवलेल्या गुप्त राजनैतिक कागदपत्राचा खुलासा केला होता. तथापि, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी इम्रान खान यांना देशाची गुपिते लीक केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. पण उच्च न्यायालयाने निवडणुकीत भाग घेण्यापासून त्यांची अपात्रता स्थगित करण्यास नकार दिल्यानंतर एक दिवसानंतर हा निर्णय आला.
एका लेखी आदेशात, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितले की त्यांना पुरेशा सबळ पुराव्यांअभावी जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर इम्रान खान निवडणूक लढवू शकतील, अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता निवडणूक आयोगाने उमेदवारी नाकारल्याने त्यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे.