इम्रान खान यांना मोठा धक्का! 'विश्वासू' फवाद चौधरींनी सोडली साथ, घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 10:37 PM2023-05-24T22:37:27+5:302023-05-24T22:46:14+5:30
Pakistan, Imran Khan: फवाद यांनी पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (PTI) पक्ष सोडला, ट्विटदेखील केले.
Imran Khan Pakistan, Fawad Chaudhary: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळचे लोक त्यांना एक एक करून सोडत आहेत. आता त्यांच्या सरकारमध्ये मंत्री होते इम्रान यांचे माजी सहकारी फवाद चौधरी यांनीही पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. बुधवारी फवादने ट्विटर हँडलवरून ही माहिती देत इम्रान यांना आणखी एक झटका दिला. फवाद यांच्या पक्षातून जाण्याने इम्रानसोबतच पीटीआयलाही मोठा धक्का बसला आहे. फवादनेही इम्रान खानसोबतचे संबंध तोडल्याचीही चर्चा आहे. फवाद राजीनामा देण्याच्या काही तास आधी इम्रान म्हणाले होते की, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना 'जबरदस्तीने घटस्फोट' घ्यायला लावला जात आहे.
राजकारणातून ब्रेक घेत असल्याची माहिती
फवादने त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, "माझ्या आधीच्या विधानाचा संदर्भ घेऊन, ज्यात मी 9 मेच्या घटनांचा स्पष्ट निषेध केला होता, मी राजकारणातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच मी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला असून इम्रान खान यांच्यापासूनही लांब होत आहे. फवाद आता पीटीआय नेत्यांच्या लांबलचक यादीचा एक भाग बनले आहेत, ज्यांनी 9 मेच्या हिंसाचारानंतर पीटीआय सोडण्याची घोषणा केली आहे. इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केल्यानंतर देशभरात हिंसाचार उसळला होता. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) इम्रानला अटक केली होती.
Ref. My earlier statement where I unequivocally condemned 9th May incidents, I have decided to take a break from politics, therefore, I have resigned from party position and parting ways from Imran Khan
— Ch Fawad Hussain (@fawadchaudhry) May 24, 2023
डॉ. शिरीन माजरी, फैयाझुल हसन चौहान, मलिक अमीन अस्लम, महमूद मौलवी, आमिर कयानी, जय प्रकाश, आफताब सिद्दीकी आणि संजय गंगवानी यांच्यासह अनेक नेते पीटीआयमधून आतापर्यंत गेले आहेत. इस्लामाबादमध्ये माध्यमांशी बोलताना शिरीनने पक्ष सोडण्याची घोषणा केली होती. आपण केवळ पक्षच सोडत नाही तर सक्रिय राजकारणाचाही निरोप घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. १२ दिवसांच्या तुरुंगवासात त्यांची आणि त्यांची मुलगी इमान मजारी हिला खूप त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले. शिरीनच्या यांच्या शब्दात सांगायचे तर, 'माझ्या मुलांसाठी, कुटुंबासाठी आणि आरोग्यासाठी मी राजकारण सोडत आहे. माझे कुटुंब आणि मुले ही माझी पहिली प्राथमिकता आहे. 9 आणि 10 मे रोजी घडलेल्या घटनांचा मी निषेध करते,' असे त्या म्हणाल्या.
इम्रान काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते, पीटीआयचे नेते ज्या प्रकारे पक्ष सोडत आहेत, ती पद्धत केवळ पीटीआय कमकुवत करणार नाही तर पाकिस्तानच्या आधीच कमकुवत झालेल्या लोकशाहीलाही धोका निर्माण करेल. तथापि, इम्रानवर विश्वास ठेवला तर, त्यांच्या नेत्यांना 'बंदुकीच्या जोरावर' पक्षातून 'जबरदस्तीने घटस्फोट' दिला जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते, हे पीटीआय फोडून वेगळा गट तयार करण्याचे प्रयत्न आहेत, जसे पीएमएल-एनचे विभाजन होऊन रातोरात पीएमएल-क्यू पक्षाची स्थापना झाली.