प्रदूषणाचे सर्वाधिक मृत्यू भारतात!, हवेचे प्रदूषण हे सर्वात मोठे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:41 AM2017-10-22T00:41:39+5:302017-10-22T00:43:24+5:30
सन २०१५ मध्ये प्रदूषणामुळे जगात झालेल्या ९० लाख मृत्यूंपैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे २५ लाख मृत्यू भारतात झाल्याचा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय अभ्यास पाहणीत काढण्यात आला आहे.
लंडन : सन २०१५ मध्ये प्रदूषणामुळे जगात झालेल्या ९० लाख मृत्यूंपैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे २५ लाख मृत्यू भारतात झाल्याचा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय अभ्यास पाहणीत काढण्यात आला आहे.
‘लॅन्सेट’ या विख्यात वैज्ञानिक नियतकालिकाने प्रदूषणामुळे आरोग्यावर होणा-या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील ४० तज्ज्ञांचा आयोग नेमला. आयोगाच्या अहवालात हा निष्कर्ष काढला आहे. पर्यावरणविषयक वैज्ञानिक फिलिप लॅन्ड्रीग्रान या अभ्यासकांच्या चमूचे प्रमुख होते. हा अहवाल ‘लॅन्सेट’च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
अहवालानुसार जगभरात प्रदूषणामुळे सर्वाधिक म्हणजे २८ टक्के मृत्यू भारतात होतात. १८ लाख मृत्यू झालेल्या चीनचा याबाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो.
सर्व प्रकारच्या प्रदूषणांमध्ये हवेचे प्रदूषण अकाली मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. पाहणी केलेल्या वर्षात प्रदूषणाशी संबंधित ९० लाख मृत्यूंपैकी ६५ लाख मृत्यू हवेच्या प्रदूषणाने झाल्याचे दिसते. जगातील १० देशांपैकी
भारतात प्रदूषणाने होणा-या मृत्यूंमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून आले. हवेच्या प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हवेतील धूळ व कार्बन कणांच्या मोठ्या प्रमाणामुळे झाले होते. भारताच्या अनेक शहरांमध्ये हवेतील या तरंगत्या कणांचे प्रमाण वर्षभर सरासरी प्रमाणाहून ५० टक्क्यांहून जास्त आढळून आले.
तुलनेने पाण्याचे प्रदूषण हे कमी मृत्यूंना कारणीभूत ठरले. त्या वर्षी भारतात ६४ हजार, तर चीनमध्ये ३४ हजार लोक पाण्याच्या प्रदूषणामुळे दगावले होते. जगभरातील अकाली मृत्यूंपैकी १६ टक्के मृत्यूंचे मूळ प्रदूषणाशी निगडित असल्याचे अभ्यासातूून दिसले. भारतात हे प्रमाण एकूण मृत्यूंच्या २५ टक्के एवढे जास्त होते. असे ९२ टक्के मृत्यू अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये झाले. त्यातही अल्पसंख्य समाज व गरीब व विशेषत: लहान मुले प्रदूषणाला अधिक बळी पडत असल्याचाही निष्कर्ष या अभ्यासकांनी काढला.
एड््स, क्षयरोग व मलेरिया या तिन्हींनी मिळून होणा-या मृत्यूपेक्षा प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंचे प्रमाण तिपटीने अधिक आहे. चुकीचा आहार, अतिस्थूलपणा, अतिमद्यसेवन, रस्ते अपघात तसेच माता व बालकांचे कुपोषण यामुळे होणा-या मृत्यूंहूनही प्रदूषण मृत्यू अधिक असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. (वृत्तसंस्था)
भारतातील मृत्यूंची वर्गवारी
हवेचे प्रदूषण १८ लाख १० हजार
पाण्याचे प्रदूषण ५ लाख
सार्वजनिक अस्वच्छता ३.२० लाख
प्रदूषणामुळे होणारे रोग
श्वसनसंस्थेचे रोग - 51%
फुप्फुसाचा कर्करोग- 41%
इस्चेमिक हार्ट डीसीज- 27%
मेंदूचा स्ट्रोक- 23%
कार्डिओव्हॅस्क्युलर - 21%