पाकच्या अण्वस्त्रांपासून जगाला सर्वाधिक धोका; अमेरिकचे अध्यक्ष जो बायडेन यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 06:32 AM2022-10-16T06:32:51+5:302022-10-16T06:33:20+5:30
पाकिस्तानला आजवर सर्व प्रकारची भरीव मदत करणाऱ्या देशाच्या प्रमुखाने असे विधान केल्याने याला विशेष महत्त्व आहे.
वॉशिंग्टन : पाकिस्तानकडे कोणत्याही नियंत्रणाविना अण्वस्त्रे असल्याने तो जगातील सर्वांत धोकादायक देशांपैकी एक आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीच्या एका कार्यक्रमात बोलताना जागतिक स्तरावरील बदलत्या भू-राजकीय परिस्थितीच्या संदर्भात त्यांनी हे विधान केले. पाकिस्तानला आजवर सर्व प्रकारची भरीव मदत करणाऱ्या देशाच्या प्रमुखाने असे विधान केल्याने याला विशेष महत्त्व आहे.
पाश्चात्य देशांनी पाकिस्तानकडील अण्वस्त्रांच्या सुरक्षेबाबत नेहमीच चिंता व्यक्त केली आहे. पाकची अण्वस्त्रे दहशतवादी किंवा जिहादी घटकांच्या हाती पडू शकतात, अशी चिंता त्यांना सतावत आहे. आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अण्वस्त्रांची गरज असल्याचे सांगून पाकिस्तानने मे १९९८ पासून अणुचाचणी घेणे सुरू केले. तेव्हापासून अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना पाककडील अण्वस्त्र साठा चुकीच्या हातांत पडण्याच्या भीतीने पछाडलेले आहे. (वृत्तसंस्था)
तालिबान्यांच्या विजयाने चिंता आणखी वाढली
या भीतीत अफगाणिस्तानातील तालिबानच्या विजयानंतर पाकमधील जिहादी सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करू शकतात, या शक्यतेचीही भर पडली आहे, असे ब्रुकिंग्स येथील परराष्ट्र धोरण कार्यक्रमाचे अनिवासी वरिष्ठ संशोधक मर्विन काल्ब यांनी गेल्यावर्षी लिहिले होते. अफगाणिस्तानातून सुरक्षा दले झपाट्याने काढून घेतल्यामुळे पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा वरिष्ठ अमेरिकी लष्करी अधिकारी मार्क मिले यांनी दिला होता.
माजी मुख्य न्यायाधीशांची हत्या
बलुचिस्तान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मोहंमद नूर मेस्कनजई यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी मशिदीतून परत येताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"