बिलावल भुत्तोंची मुक्ताफळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पातळी ओलांडून आक्षेपार्ह टीका, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 04:57 PM2022-12-16T16:57:45+5:302022-12-16T16:58:14+5:30
Bilawal Bhutto: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल जरदारी भुत्तो सातत्याने भारतावर टीका करत आहेत. दरम्यान, गुरुवारी न्यूयॉर्कमधील एका पत्रकार परिषदेत बिलावल भुत्तो यांनी सर्व मर्यादा पार करत मुक्ताफळे उधळली.
न्यूयॉर्क - गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय मंचावर भारताविरोधात प्रक्षोभक विधाने केली जात आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल जरदारी भुत्तो सातत्याने भारतावर टीका करत आहेत. दरम्यान, गुरुवारी न्यूयॉर्कमधील एका पत्रकार परिषदेत बिलावल भुत्तो यांनी सर्व मर्यादा पार करत मुक्ताफळे उधळली. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानवर ओसामा बिन लादेनला आश्रय दिल्याचा आरोप करत टीका केल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधानांवर वैयक्तिक आरोप करत टीकेची पातळी ओलांडली.
संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेले बिलावल भुत्तो एस. जयशंकर यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वी अमेरिकेने त्यांच्या अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घातली होती. नरेंद्र मोदी आणि एस. जयशंकर हे भारताचे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री आहेत.
न्यूयॉर्कमधील पत्रकार परिषदेमध्ये बिलावल भुत्तो म्हणाले की, भारत सरकार गांधीजींच्या विचारसरणीवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांच्या हत्याऱ्यांच्या विचारांवर विश्वास ठेवते. भारत सरकारवर हिलटलरचा प्रभाव आहे, अशी मुक्ताफळे बिलावल भुत्तो यांनी उधळली. यावेळी पाकिस्तानमधील वाढत्या दहशतवादी कारवायांसाठीही भुत्तो यांनी पाकिस्तानला जबाबदार धरले. पाकिस्तानमधील दहशतवादाला शेजारील देशाकडून प्रोत्साहन मिळत आहे. विदेशी शक्ती बलुचिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप बिलावल भुत्तो यांनी केला.