पाकमधील ज्येष्ठ समाजसेविका बिलकिस बानाे इदी यांचे निधन; भारताच्या गीताला घेतले हाेते दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 08:14 AM2022-04-17T08:14:38+5:302022-04-17T08:15:25+5:30
सुमारे महिनाभरापासून त्यांचा आजार वाढला हाेता. काही दिवसांपूर्वी रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे, त्यांना कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते.
इस्लामाबाद : पाकिस्तानातील ज्येष्ठ समाजसेविका बिलकिस बानाे इदी (७४) यांचे प्रदीर्घ आजारपणानंतर निधन झाले. त्यांचा भारताशीही संबंध आला हाेता. समझोता एक्स्प्रेसमध्ये सापडलेल्या ८ वर्षीय गीता या दिव्यांग मुलीला त्यांनी दत्तक घेतले हाेते. त्यानंतर, गीता हिला २०१५ मध्ये भारतात परत आणण्यात आले हाेते.
बिलकिस यांना २०१५ मध्ये मदर तेरेसा स्मृती आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हाेते, तर १९८६ मध्ये त्यांचा रेमन मॅगसेसे पुरस्कारानेही गाैरव करण्यात आला हाेता. समाज कल्याणासाठी त्यांनी अब्दुल सत्तार इदी फाउंडेशनची स्थापना केली हाेती. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पतीच्या साेबतीने सामाजिक कार्यामध्ये स्वत:ला झाेकून दिले हाेते. बिलकिस यांना हृदय आणि फुप्फुसांसंबंधी आजारांनी ग्रासले हाेते. सुमारे महिनाभरापासून त्यांचा आजार वाढला हाेता. काही दिवसांपूर्वी रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे, त्यांना कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते.