कोरोना लस सर्वांना मिळेपर्यंत...; बिल अन् मेलिंडा गेट्स यांनी सांगितला पुढचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 03:41 PM2021-01-29T15:41:01+5:302021-01-29T15:41:33+5:30

जागतिक आरोग्य स्थानिक स्तरावर आणणारे वर्ष; बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी प्रसिद्ध केले २०२१ सालातील वार्षिक पत्र

Bill and Melinda Gates Release 2021 Annual Letter The Year Global Health Went Local | कोरोना लस सर्वांना मिळेपर्यंत...; बिल अन् मेलिंडा गेट्स यांनी सांगितला पुढचा धोका

कोरोना लस सर्वांना मिळेपर्यंत...; बिल अन् मेलिंडा गेट्स यांनी सांगितला पुढचा धोका

googlenewsNext

सिएटल: बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी २०२१ सालासाठीचे वार्षिक पत्र आज शेअर केले, “द इयर ग्लोबल हेल्थ वेण्ट लोकल” (जागतिक आरोग्य स्थानिक स्तरावर आणणारे वर्ष) असे पत्राचे शीर्षक आहे. या वर्षीच्या पत्रात बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी कोविड-१९ साथीचा जगभरात झालेला परिणाम आणि सामाजिक आरोग्यासाठी झालेल्या इतिहासातील सर्वांत मोठ्या प्रयत्नामधील जागतिक समन्वय व वैज्ञानिक नावीन्यपूर्णता यावर प्रकाश टाकला आहे. जग या साथीतून अधिक कणखर आणि निरोगी होऊन बाहेर पडेल असा आशावाद त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे. समानतेला प्राधान्य देणे व पुढील साथीच्या दृष्टीने सज्ज राहणे ही दोन क्षेत्रे अधिक चांगला भविष्यकाळ घडवण्यासाठी कशी आवश्यक आहेत यावर त्यांनी चर्चा केली आहे.

कोविड-१९ आजाराने अनेकांचे प्राण घेतले, लक्षावधींना आजारी केले आणि जागतिक अर्थव्यवस्थेला एका विनाशकारी मंदीच्या गर्तेत ढकलले. यातून सावरण्यासाठी अद्याप आपल्याला अजून दीर्घ प्रवास करणे आवश्यक असले, तरी नवीन चाचण्या, उपचारपद्धती व लशींच्या स्वरूपात जगाने काही लक्षणीय विजय साध्य केले आहेत. या नवीन साधनांनी लवकरच समस्यांचे निराकरण होऊ लागेल, असा विश्वास बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी व्यक्त केला आहे.

साथीवर मात करण्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून जगभरातील उदार व्यक्तींनी संसाधनांच्या स्वरूपात देणग्या दिल्या, प्रतिस्पर्ध्यांनी संशोधनातील निष्कर्षांचे आदानप्रदान केले आणि अनेक वर्षांच्या जागतिक गुंतवणुकीने विक्रमी वेळात लशीचा विकास, सुरक्षित डिलिव्हरी व प्रभावी लस यांचे नवीन विश्व खुले केले, असे बिल आणि मेलिंडा यांचे म्हणणे आहे. मात्र, त्याचबरोबर साथीमुळे आरोग्यक्षेत्रातील अनेक असमानता तीव्र झाल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, विशिष्ट वर्णाचे समुदाय, गरीब आणि स्त्रिया यांना दिली जाणारी असामनतेची वर्तणूक विशेषत्वाने दिसून आली आहे, असा इशारा ते देतात. या साथीमुळे रोगप्रतिकारशक्तीतील असमानता हा अन्यायाचा एक नवीन प्रकार कायमस्वरूपी प्रस्थापित होऊ शकेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. विषाणूच्या असमान सामाजिक व आर्थिक परिणामावर उपाय म्हणून सर्वसमावेशक प्रतिसाद दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

“कोविड-१९ हा कोठेही धोकादायक आहे हे संपन्न राष्ट्रांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन आम्ही साथीच्या सुरुवातीच्या काळापासून करत आहोत. लस सर्वांपर्यंत पोहोचेपर्यंत आजाराचे नवीन प्रकार पुढे येतील. असमानतेचे चक्र सुरूच राहील,” असे मेलिंडा लिहितात. “२०२० साली विकसित झालेल्या प्राणरक्षक विज्ञानामुळे २०२१ मध्ये जास्तीतजास्त लोकांचे प्राण वाचले पाहिजेत यासाठी जग एकत्र येते की नाही यावर सर्वकाही अवलंबून आहे.”

नवीन साथीबद्दल आत्ताच विचार करणे आवश्यक आहे, यावर बिल आणि मेलिंडा भर देतात. नवीन साथ रोखण्यासाठी आपल्याला दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागणार असले, तरी कोविड-१९ साथीमुळे जगाला अंदाजे २८ ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. चाचण्या, उपचार आणि लशींसाठी सातत्यपूर्ण गुंतवणूक करण्याचे आवाहन ते करतात तसेच रोगांच्या साथी सुरू झाल्यानंतर लगेचच त्या ओळखून जागतिक स्तरावर सावधगिरी बाळगण्याचे महत्त्व या विषयावरही त्यांनी या पत्रात विवेचन केले आहे.

“साथींना आपण किती गांभीर्याने घेतले पाहिजे हे आता जगाला समजले आहे,” बिल लिहितात. “नवीन साथीबाबत सज्जतेसाठी धोरणे आखली जात असल्याचे आपण बघतच आहोत आणि येत्या काही महिन्यात यात वाढ होईल, असे मला अपेक्षित आहे. कोविड-१९ साथीच्या प्रतिकारासाठी जग सज्ज नव्हते. पुढील साथीच्या वेळी परिस्थिती वेगळी असेल.”

प्रत्येक व्यक्ती आरोग्यपूर्ण व उत्पादनक्षम आयुष्याची संधी  प्राप्त करण्यासाठी पात्र आहे या विश्वासावर बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन स्थापन करण्यात आली आहे. आजपर्यंत फाउंडेशनने कोविड-१९ साथीविरोधात लढण्यासाठी १.७५ अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये लशी, चाचणी व उपचारांच्या विकासासाठी व न्याय्य डिलिव्हरीसाठी सहाय्य पुरवण्याचा समावेश आहे.

Web Title: Bill and Melinda Gates Release 2021 Annual Letter The Year Global Health Went Local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.