Bill Gates: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना कोरोनाची लागण; बूस्टर डोस घेऊनही संक्रमित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 09:50 AM2022-05-11T09:50:50+5:302022-05-11T09:54:38+5:30
Bill Gates Corona Positive: कोरोनाची लागण झाल्यानंतर बिल गेट्स यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे.
Bill Gates Corona Positive: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. पूर्णपणे निरोगी होईपर्यंत ते आयसोलेशनमध्ये राहणार आहे.
I've tested positive for COVID. I'm experiencing mild symptoms and am following the experts' advice by isolating until I'm healthy again.
— Bill Gates (@BillGates) May 10, 2022
बिल गेट्स यांनी ट्विट केले की, ''माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सध्या सौम्य लक्षणे जाणवत आहेत. मी पूर्णपणे निरोगी होईपर्यंत आयसोलेशनमध्ये राहणार असून, डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहे." ते पुढे म्हणाले की, "मी भाग्यवान आहे की, मी कोरोनाचा बूस्टर डोस घेतला आहे. कोरोना चाचणी आणि वैद्यकीय मदतीसाठी आमच्याकडे चांगल्या सुविधा आहेत."
We will continue working with partners and do all we can to ensure none of us have to deal with a pandemic again.
— Bill Gates (@BillGates) May 10, 2022
गेट्स यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले की, ''गेट्स फाउंडेशनच्या टीम्स दोन वर्षानंतर पहिल्यांदाच एकत्र येत आहेत आणि सर्वांना पाहण्याची आणि त्यांच्या मेहनतीबद्दल त्यांचे आभार मानण्याची संधी मिळाल्याने मी भाग्यवान आहे. आम्ही आमच्या भागीदारांसोबत काम करणे सुरू ठेवू आणि आपल्यापैकी कोणालाही पुन्हा साथीच्या रोगाचा सामना करावा लागणार नाही, यासाठी आम्ही सर्वकाही करू."
जगातील सर्वात मोठ्या खाजगी संस्थांपैकी एक
सिएटल येथील ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ ही जगातील सर्वात प्रभावशाली खाजगी संस्थांपैकी एक आहे. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे $65 अब्ज आहे. बिल गेट्स हे महामारी रोखण्यासाठी उचललेल्या पावलांचे समर्थक आहेत. विशेषतः गरीब देशांमध्ये ते लोकांसाठी लस आणि औषधे उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत.
गेट्स फाऊंडेशनने ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते की, ते औषध निर्माते मर्कच्या अँटीव्हायरल COVID-19 गोळीची जेनेरिक आवृत्ती कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आणण्यासाठी $120 दशलक्ष खर्च करणार आहेत.