"माझ्या मुलाचा मला अभिमान नाही, कारण..." इलोन मस्कच्या वडिलांचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 03:28 PM2022-08-02T15:28:53+5:302022-08-02T15:35:30+5:30
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलोन मस्क यांच्या वडिलांना त्यांचा थोडाही अभिमान नाही.
Elon Musk:आई-वडिलांना आपल्या मुलांच्या यशावर किंवा कतृत्वावर अभिमान असतो. मुलाने एखादे मोठे काम केले, तर पालक अभिमानाने सर्वांना सांगत असतात. पण, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलोन मस्क (Elon Musk) यांच्या वडिलांना त्यांचा थोडाही अभिमान नाही. इरोल मस्क (Errol Musk) यांनी एका मुलाखतीत याबाबत एक खुलासा केला आहे.
76 वर्षीय इरोल मस्क यांनी सोमवारी ऑस्ट्रेलियातील रेडियो स्टेशन KIIS FM वर 'काइल अँड जॅकी' यांच्या शोमध्ये बोलताना याबाबत खुलासा केला. यावेळी त्यांनी इलोन मस्क आणि मस्क कुटुंबातील इतर लोकांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी इलोन मस्क यांचे लहान भाऊ किंबल मस्क यांच्यावर गर्व असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी इलोन मस्क यांच्या यशाला कमी लेखले.
काय म्हणाले इरोल मस्क?
मुलाखतीदरम्यान आर जे जॅकीने विचारले की, 'तुमचा मुलगा एक प्रतिभावान व्यक्ती आहे. त्यांनी अनेक गोष्टी बनवल्या आहेत, त्यांच्याकडे अफाट पैसा आहे. तुम्हाला त्यांचा अभिमान आहे?' यावर 76 वर्षीय इरोल मस्क म्हणाले की, ''संपूर्ण मस्क कुटुंबाने काही ना काही मोठे काम केले आहे. आम्हाला अचानक मिळाले नाही. त्यामुळे इलोनच्या यशावर गर्व नाही.'
ते पुढे म्हणाले की, 'इलोन, टोस्का आणि किंबल लहान होते, तेव्हा त्यांच्यासोबत मी जगभर फिरलो. आमच्या मुलांनी अनेक गोष्टी पाहिल्या, बर्याच गोष्टी एकत्र केल्या, पण इलोनला तो पाच वर्षे मागे असल्याचे वाटते. इलोनने सर्व गोष्टी मिळवल्या, पण तो अजूनही स्वतःच्या यसावर निराश असतो.'