मृत्यूच्या सहा वर्षांनी जिवंत झाला अब्जाधीश; 75 हजार कर्मचारी, जगभरात पसरलाय व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 10:53 PM2024-04-19T22:53:54+5:302024-04-19T22:54:47+5:30
Karl-Erivan Haub found Alive: अब्जाधीश सहा वर्षांनी जिवंत सापडल्याने उद्योगजगतात खळबळ उडाली आहे. बेपत्ता होण्यापूर्वी ते स्वित्झरलँडच्या मॅटरहॉर्न पर्वताजवळ गिर्यारोहण स्पर्धेती तयारी करत होते.
जगात एक खळबळजनक घटना घडली आहे. जर्मन-अमेरिकी अब्जाधीश कार्ल एरिवान हाऊब यांना २०१८ पासून बेपत्ता असल्याने कोर्टाने २०२१ मध्ये मृत घोषित केले होते. आता हाऊब यांना रशियात पाहिले गेले असल्याचा दावा करण्यात आला आहे. हाऊब हे रशियात प्रेयसीसोबत राहत असल्याचे समोर आले आहे.
अब्जाधीश सहा वर्षांनी जिवंत सापडल्याने उद्योगजगतात खळबळ उडाली आहे. हाऊब हे ५८ वर्षांचे आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी ते स्वित्झरलँडच्या मॅटरहॉर्न पर्वताजवळ गिर्यारोहण स्पर्धेती तयारी करत होते. तिथे ते सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. परंतु तिथून ते अचानक गायब झाले. सुरुवातीला त्यांचे अपहरण झाले असावे किंवा अपघात झाला असावा असा संशय जर्मन सरकारला आला. जर्मनीने यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहिमही सुरु केली होती. परंतु अपयश आले होते.
पर्वत रागांमध्ये पाच हेलिकॉप्टर सलग सहा दिवस घिरट्या घालत होती. कारण हाऊब हे टँजेलमॅन ग्रुपचे प्रमुख होते. त्यांच्या कंपनीचा व्यवसाय जगभरात पसरला होता. या कंपनीचे ७५ हजारांवर कर्मचारी होते. हाऊब बेपत्ता झाल्याने या सर्वांसमोर मोठा प्रश्न होता. अखेर कोर्टाने २०२१ मध्ये हाऊब यांना मृत घोषित करण्यात आले होते. यानंतर त्यांचा भाऊ ख्रिश्चियन यांनी ही कंपनी ताब्यात घेतली होती.
हाऊब जेव्हा बेपत्ता झालेले तेव्हा त्यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडला १३ वेळा फोन केला होता. एर्मिलोवा ही रशियन होती. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली होती. परंतु तपासात काहीच धागेदोरे सापडले नव्हते. जर्मन आणि अमेरिकेचे अधिकारी पार मॉस्कोपर्यंत गेले होते. आता झालेल्या तपासात हाऊब हे मॉस्कोमध्ये दिसले आहेत.