इराणमध्ये पैगंबरावर ‘बिनचेहऱ्याचा’ चित्रपट !

By admin | Published: August 27, 2015 01:17 AM2015-08-27T01:17:04+5:302015-08-27T01:17:04+5:30

पैगंबराचा चेहरा एकदाही न दाखविता प्रेषित महम्मदाचा जीवनपट उलगडणारा ‘मुहम्मद’ हा चित्रपट बुधवारी इराणमध्ये एकाच वेळी १४३ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

'Binchehara' movie on the eagle in Iran! | इराणमध्ये पैगंबरावर ‘बिनचेहऱ्याचा’ चित्रपट !

इराणमध्ये पैगंबरावर ‘बिनचेहऱ्याचा’ चित्रपट !

Next

तेहरान : पैगंबराचा चेहरा एकदाही न दाखविता प्रेषित महम्मदाचा जीवनपट उलगडणारा ‘मुहम्मद’ हा चित्रपट बुधवारी इराणमध्ये एकाच वेळी १४३ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.
जागतिक पातळीवर नावाजले गेलेले ५६ वर्षांचे इराणी दिग्दर्शत माजिद माजिदी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यात इराणमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांनी भूमिका केल्या आहेत. सुमारे ४० दशलक्ष डॉलर खर्च करून तयार झालेला हा चित्रपट इराणमध्ये तयार झालेला आजवरचा सर्वाधिक खर्चिक चित्रपट आहे. तो पूर्ण व्हायला सात वर्षे लागली.
माजिद माजिदी एकूण तीन भागांमध्ये (ट्रायॉलॉजी) मिळून पैगंबराचे जीवन आणि शिकवण रुपेरी पडद्यावर साकारणार असून ‘मुहम्मद’ हा त्यातील पहिला भाग आहे. त्यात महम्मदाच्या जन्माआधीपासून ते त्याच्या किशोरावस्थेपर्यंतचा कालखंड चित्रित करण्यात आला आहे. कुरआननुसार महम्मद वयाच्या ४० व्या वर्षी प्रेषित झाला. म्हणजेच हा चित्रपट महम्मद पैगंबर होण्याच्या बराच आधी संपतो.
या चित्रपटासाठी इराण सरकारकडून काही प्रमाणात अर्थसाह्य देण्यात आले असून शिया मुस्लिमांचे आठवे इमाम रझा यांच्या जन्मदिनानिमित्त शिया मुस्लिम बहुसंख्येने असलेल्या इराणमध्ये ‘मुहम्मद’ प्रदर्शित करण्यात आला आहे. गुरुवारी हा चित्रपट मॉन्ट्रियल चित्रपट महोत्सवातही दाखविण्यात येणार आहे. निर्गुण-निराकार एकेश्वरवादी इस्लाममध्ये प्रेषिताची छबी कोणत्याही स्वरूपात प्रदर्शित करणे पूर्णपणे निषिद्ध मानलेले आहे. हा दंडक माजिद माजिदी यांनी तंतोतंत पाळला असून १७१ मिनिटे लांबीच्या या चित्रपटात प्रेषित महम्मदाची भूमिका वठविणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा एकदाही दाखविण्यात आलेला नाही. माजिदी म्हणतात की, संपूर्ण चित्रपटात नायक असूनही त्याचा चेहरा एकदाही न दाखविणे हे एक मोठे आव्हान होते. चित्रपटात पे्रषिताला पाहण्याची प्रत्येकालाच उत्सूकता आहे, पण त्यांना प्रेषिताचा चेहरा अजिबात दिसत नाही.
माजिद माजिदी आणि त्यांचे आॅस्कर विजेते इटालियन सिनेमॅटोग्राफर विट्टोरियो स्टोरॅरो यांनी हे आव्हान पेलण्यासाठी एका खास तंत्राचा वापर केला. माजिदी म्हणतात, आम्ही एक स्टेडिकॅम कायम मुहम्मदाच्या पाठीशी ठेवून चित्रिकरण केले. म्हणजेच चित्रपटातील दृष्यांमध्ये प्रेषित न दिसता प्रेक्षकांना
त्याच्या नजरेतून दृष्ये दिसतात किंवा फार तर महम्मदाची फक्त पाठ दिसू शकते.
माजिदी म्हणतात की, या चित्रपटात पैगंबराच्या जीवनाचा जो कालखंड येतो त्याविषयी कोणताही वाद नाही. खरी कसोटी प्रेषितावस्थेपासूनच्या पुढील कालखंडाची आहे. त्या कालखंडातील घटना व पैगंबरांच्या प्रसंगोपात्त उक्ती व कृतीविषयी अनेक वाद-प्रवाद असल्याने आम्हाला प्रेषिताचा चेहरा न दाखविण्याखेरीज त्याच्या तोंडचे संवाद दाखवितानाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आम्ही हे आव्हानही यशस्वीपणे पेलू, याची आम्हाला खात्री आहे.
सलमान रश्दींनी ‘सतानिक व्हर्सेस’मध्ये प्रेषित महम्मदचा उपमर्द केला म्हणून इराणच्या कट्टर धर्मगुरुंनी त्यांच्याविरुद्ध देहदंडाचा फतवा काढला होता. दोनच वर्षांपूर्वी प्रेषिताची व्यंगचित्रे प्रसिद्ध केल्याबद्दल ‘चार्ली हेब्दो’ या फ्रेंच विनोदी नियतकालिकाचे कार्यालय जाळण्यात आले होते. त्याच इराणमध्ये हा आव्हानात्मक चित्रपट तयार करूनप्रदर्शित करणे हे खरे तर धाष्ट्याचेच काम आहे. तरीही कलाविष्कारांमधून प्रेषित आणि कुरआनाच्या चित्रिकरणाच्या बाबतीत सुन्नींच्या तुलनेने शिया थोडे मवाळ मानले जातात. कदाचित म्हणूनच सुन्नीबहुल इराणच्या अनेक चित्रपटगृहांमध्ये ‘मुहम्मद’ चित्रपटाचे खेळ आगाऊ तिकिटविक्रीने ‘हाऊस फुल्ल’ झाले आहेत. याची दखल घेत माजिदी म्हणतात, सौदी अरबस्तानसारख्या काही देशांमध्ये हा चित्रपट नक्कीच अडचणीत येईल. पण तुर्कस्तान, इंडोनेशिया, मलेशिया यासारख्या इस्लामी देशांसह आग्नेय आशियातील अनेक देशांनी आमच्या चित्रपटाची मागणी केली आहे.
प्रेषित महम्मदाच्या जीवनावर तयार केला गेलेला हा पहिला चित्रपट मात्र नाही. याआधी सिरियन-अमेरिकन चित्रपट निर्माते मुस्तफा अक्कड यांचा ‘मेसेंजर आॅफ गॉड’ हा चित्रपट १९७६ मध्ये प्रदर्शित झााला तेव्हाही इस्लामी विश्वात त्यावर सडकून टीका झाली होती. स्वत: माजिद मजिदीही मुरब्बी दिग्दर्शक आहेत. याआधी त्यांच्या ‘चिल्ड्रन आॅफ हेवन’, ‘दि कलर आॅफ पॅराडाईस‘ आणि ‘बरान’ या चित्रपटांना रसिकांनी डोक्यावर घेतले होते. (वृत्तसंस्था)

तरीही विरोधाचे सूर : माजिदी यांनी हा चित्रपट बनविताना इस्लामी श्रद्धांना धक्का न लावण्याची काळजी घेतली असली तरी रुपेरी पडद्यावरील प्रेषिताच्या या जीवनपटाविषयी णराममध्येही विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. ‘अल-अजहर’ हे सुन्नी इस्लामी धर्मशास्त्राचे जगन्मान्य पीठ मानले जाते. ‘अल-अजहर’चे प्रवक्ते अब्देल दाय्येम नोशेर यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, प्रेषितांचा केवळ चेहरा न दाखविणे पुरे नाही. त्यांचे जीवन दृक्श्राव्य ललितकलांच्या माध्यमातून चित्रित करणे हेही त्यांच्या आध्यात्मिक उंचीला खुजेपणा आणणारे आहे, असे आम्हाला वाटते. आता ज्या अभिनेत्याने पैगंबरांची भूमिका केली आहे तोच उद्या कदाचित एखाद्या गुन्हेगाराचे पात्र पडद्यावर वठवील. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वाभाविकच पैगंबर आणि गुन्हेगारी यांची सांगड घातली जाईल.

दहशतवाद्यांनी आणि इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया (इसिस) सारख्या बंडखोेर अतिरेक्यांनी पवित्र इस्लामचे नाव बद्द्ु केले आहे. पाश्चात्य जगातही इस्लामची हिंसाचारी अशी चुकीची प्रतिमा निर्माण झाली आहे. तीन चित्रपटांच्या या मालिकेतून इस्लाम आणि त्याच्या प्रेषिताचे वास्तव रूप जगापुढे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-माजिद माजिदी, दिग्दर्शक, ‘मुहम्मद’

Web Title: 'Binchehara' movie on the eagle in Iran!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.