आॅस्कर पुरस्कारांत ‘बर्डमॅन’ची बाजी
By Admin | Published: February 23, 2015 11:07 PM2015-02-23T23:07:00+5:302015-02-23T23:07:00+5:30
करिअरच्या पुनरुज्जीवनासाठी संघर्ष करत असलेल्या माजी सुपरस्टारची हृदयद्रावक कहाणी असलेल्या ‘बर्डमॅन’ या चित्रपटाने सोमवारी आॅस्कर पुरस्कारांत बाजी मारली.
लॉस एंजल्स : करिअरच्या पुनरुज्जीवनासाठी संघर्ष करत असलेल्या माजी सुपरस्टारची हृदयद्रावक कहाणी असलेल्या ‘बर्डमॅन’ या चित्रपटाने सोमवारी आॅस्कर पुरस्कारांत बाजी मारली. हसता हसता डोळ्यात पाणी आणणाऱ्या ब्लॅक कॉमेडी प्रकारातील या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
८७ व्या आॅस्कर पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेल्या बर्डमॅनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचाही पुरस्कार मिळणे हा या चित्रपटाचे दिग्दर्शक अलेजान्द्रो इनारितू यांच्यासाठी दुग्धशर्करा योग ठरला. याशिवाय सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कारही याच चित्रपटाच्या झोळीत गेला. बर्डमॅनने अटीतटीच्या लढतीत रिचर्ड लिंकलेटर यांच्या बॉयहूड या चित्रपटाला मागे सारत सर्वोच्च पुरस्कार प्राप्त केला. त्यानंतर एकापाठोपाठ चार पुरस्कार पटकावले. मात्र, ब्रिटिश अभिनेता एडी रेडमायने याने बर्डमॅनचा विजयरथ रोखत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावे केला. ‘द थिअरी आॅफ एव्हरीथिंग’ या चित्रपटात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या भूमिकेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. बर्डमॅनच्या मायकेल कीटन याच्याशी रेडमायने याची अटीतटीची स्पर्धा होती. ज्युलियन मूरला ‘स्टिल अॅलाइस’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. (वृत्तसंस्था)