नो मॅन्स लॅण्डमध्ये १५ दिवसांत १०० बाळांचा जन्म, रोहिंग्यांचा प्रश्न अधिकाधिक बिकट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 12:51 PM2017-09-14T12:51:02+5:302017-09-14T12:57:54+5:30
म्यानमारच्या राखिन प्रांतातील वांशिक तणावाला घाबरुन रोहिंग्यांचे गट नेसत्या वस्त्रानिशी बांगलादेशच्या दिशेने धाव घेत आहेत.
ढाका, दि१४- म्यानमारच्या राखिन प्रांतातील वांशिक तणावाला घाबरुन रोहिंग्यांचे गट नेसत्या वस्त्रानिशी बांगलादेशच्या दिशेने धाव घेत आहेत. त्यामध्ये वृद्ध, लहान मुले, आजारी महिला पुरुषांसह गर्भवतींचाही समावेश आहे. या रोहिंग्यांनी म्यानमार आणि बांगलादेशच्या मध्ये असणाऱ्या मो मॅन्स लॅण्डमध्ये तात्पुरता मुक्काम केला असून गेल्या १५ दिवसात या भागात १०० बालकांचा जन्म झाल्याचे ढाका ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
Many Rohingya baby born in jungle,on road without nurse,doctors & medicine.Please take step. #SavetheRohngyiaspic.twitter.com/sh5VeFZe9q
— Shahid Mehmood (@ChShahidMehmod) September 13, 2017
या नवजात बालकांची आणि त्यांच्या मातांची स्थिती अत्यंत नाजूक असून कुपोषण व भय अशा दुहेरी संकटात हे सापडले आहेत. प्रसुतीकाळ जवळ आलेली २५ वर्षांची सुरय्या नावाची महिला २६ आँगस्ट रोजी राखिन प्रांतातून बांगलादेशच्या दिशेने निघाली. मात्र वाटेतच तिला प्रसुतीकळा सुरु झाल्या. वेदनांनी किंचाळणाऱ्या सुरय्याने बॉर्डर गार्डस बांगलादेशच्या (बीजीबी) सदस्यांकडे मदतीसाठी धावा केला, तिच्या किंकाळ्यांनी इतर रोहिंग्या आश्रितही हेलावुन गेले. शेवटी बीजीबीच्या एका अधिकाऱ्याने सुरय्याला बोटीवर घेतले, पण त्याचवेळेस तिच्या प्रसवकळा वाढल्या. बोटीवर मदतीसाठी आलेल्या इतर रोहिंग्या महिलांनी तिच्या भोवती साड्या लावून आडोसा तयार केला आणि काही क्षणांतच सुरय्याने आयेशा नावाच्या मुलीला जन्म दिला. अशा अनेक सुरय्या आणि आयेशा सध्या मो मॅन्स लॅण्डमध्ये अडकलेल्या आहेत.
केवळ ४ ते १० सप्टेंबर या कालावधीत ८९ बालकांचा जन्म नो मॅन्स लॅण्ड झाला आहे. या नवजात बालकांना व त्यांच्या मातांना सध्या कोणत्याही प्रकारचा आसरा मिळालेला नसून उघड्या आभाळाखाली अन्नपाणी व औषधांविना राहावे लागत आहे. तसेच सुरय्यासारख्या अनेक ओल्या बाळंतिणींना पावसाचा मारा सहन करत दिवस काढावे लागत आहेत . युएनएफपीचे तज्ज्ञ अंगुर नाहर मोंटी यांनी अशा महिलांना औषध, संरक्षण मिळावे तसेच कोणत्याही हिंसेला सामोरे जावे लागू नये यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती दिली.