इम्रान खान यांचा मोदींवर हल्लाबोल, निवडणूक जिंकण्यासाठी F-16 विमानाच्या मुद्द्याचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 07:06 PM2019-04-06T19:06:13+5:302019-04-06T19:07:50+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत मोदींवर हल्लाबोल केला आहे.
इस्लाबामादः पाकिस्तानच्या ताफ्यात असलेली सगळी अमेरिकी एफ-16 विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाने केलेला दावा भारतीय हवाई दलाने फेटाळून लावला होता. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारीला पाकिस्तानने केलेला प्रतिहल्ला परतवून लावत असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ-16 विमान पाडले होते. त्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या मुद्द्यावर ट्विट करत मोदींवर हल्लाबोल केला आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो, हीच खरी नीती आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून आणि पाकिस्तानचं एफ 16 विमान पाडण्याच्या मुद्द्यांवरूनच भाजपाला निवडणुका जिंकायच्या आहेत. परंतु अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोदींचे हे प्रयत्न हाणून पाडले आहेत. पाकिस्तानच्या ताब्यातील कोणतंही एफ 16 विमान गायब नसल्याचं अमेरिकेनं सांगितल्याची आठवणही इम्रान खान यांनी करून दिली आहे.
भारतावर हल्ला करण्यासाठी आलेल्या एफ-16 विमानांपैकी एक विमान परत माघारी फिरले नसल्याचे पाकिस्तानी हवाई दलाच्या रेडिओ संभाषणातून उघड झाले आहे, असा दावा हवाई दलाच्या सूत्रांनी केला होता. 27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये झालेल्या हवाई चकमकीत एक-16 विमान कोसळलेच नसल्याचा तसेच पाकिस्तानच्या ताफ्यातील सगळी एफ - 16 विमाने सुरक्षित असल्याचा दावा एका मासिकाने केल्याने खळबळ उडाली होती. मात्र भारतीय हवाई दलाने हा दावा फेटाळून लावला आहे. ''विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 विमान पाकव्याप्त काश्मीरच्या 7 ते 8 किमी आत असलेल्या सब्झकोट भागात पाडले होते. तसेच पाकिस्तानी हवाई दलाचे रेडिओ संभाषण आम्ही रेकॉर्ड केले असून, त्या संभाषणामधून भारतावर हल्ला करणाऱ्या एफ-16 विमानांपैका एक विमान माघारी आले नसल्याचे स्पष्ट होत आहे , असा दावा भारतीय हवाई दलामधील सूत्रांनी केला आहे.
The truth always prevails and is always the best policy. BJP's attempt to win elections through whipping up war hysteria and false claims of downing a Pak F 16 has backfired with US Defence officials also confirming that no F16 was missing from Pakistan's fleet.
— Imran Khan (@ImranKhanPTI) April 6, 2019
14 फेब्रुवारी रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत या हल्ल्याचा बदला घेतला होता. दरम्यान, 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसखोरी करून भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क असलेल्या भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला होता. दरम्यान, यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत मिग विमान चालवत असलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते.