भाजपा प्रवक्त्यामुळे आखाती देशात भारताविरुद्ध संताप; वादग्रस्त विधानाचे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 10:50 PM2022-06-05T22:50:12+5:302022-06-05T22:51:58+5:30

आखाती देशात भारतीय वंशाच्या कामगारांचे महत्त्व यावरून दिसून येते की या देशांतील स्थलांतरित कामगारांपैकी ३० टक्के एकटे भारतीय आहेत.

BJP spokesperson Nupur Sharma controversial statement on mohammad paigambar, What affect on Gulf Countries | भाजपा प्रवक्त्यामुळे आखाती देशात भारताविरुद्ध संताप; वादग्रस्त विधानाचे पडसाद

भाजपा प्रवक्त्यामुळे आखाती देशात भारताविरुद्ध संताप; वादग्रस्त विधानाचे पडसाद

Next

अबू धाबी - मोहम्मद पैंगबर यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर दिल्लीतील भाजपा नेते नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पैंगबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे बहरीन, कतार, कुवेत, इराण आणि ओमानसारख्या आखाती देशात भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

आखाती देशांसोबतच्या भारताच्या संबंधांबद्दल बोलायचे झाले तर, गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) च्या देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात. गल्फ कोऑपरेशन कौन्सिलमध्ये प्रामुख्याने कुवेत, ओमान, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि बहरीन यांचा समावेश होतो. या देशांमध्ये भारतीय काम करतात. आखाती देशात भारतीय वंशाच्या कामगारांचे महत्त्व यावरून दिसून येते की या देशांतील स्थलांतरित कामगारांपैकी ३० टक्के एकटे भारतीय आहेत.

आखाती देशांतून पैसा भारतात येतो
भारतीय कामगार इथल्या रोजगारातून पैसे कमावतातच, पण या देशांच्या अर्थव्यवस्थेतही मोठा हातभार लावतात. आकडेवारीनुसार, भारतातून स्थलांतरितांची सर्वाधिक संख्या जगभरात पसरलेली आहे. पण हेही खरे आहे की परदेशातून येणारा बहुतांश पैसा भारतातही येतो. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, पश्चिम आशियामध्ये ८० लाखाहून अधिक भारतीय राहतात, त्यापैकी बहुतेक GCC देशांमध्ये राहतात. येथे ते भारताला ४० अब्ज डॉलरहून अधिक रक्कम पाठवतात.

भारतासाठी आखाती देशाचे महत्त्व काय? 
आखाती देशांचं भारतासाठी राजकीय, आर्थिक, सामरिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. जीसीसी देश परस्पर सहकार्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारतासाठी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात सहकार्याच्या संधी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर भारतीय तंत्रज्ञान, बांधकाम, हॉटेल आणि फायनान्सशी संबंधित कंपन्या आखाती देशांमध्ये सक्रिय आहेत. याशिवाय भारताचे आखाती देशांशी चांगले व्यापारी संबंध आहेत. त्यात यूएई आणि सौदी अरेबियाचा सर्वाधिक सहभाग आहे. याशिवाय आखाती देशांना भौगोलिक राजकीय महत्त्व आहे. भारत इराणमार्गे मध्य आशिया आणि युरोपमध्ये पोहोचतो, तर ओमानमार्गे पश्चिम हिंदी महासागरावर आपली पकड कायम ठेवतो. ओमानमध्ये भारताचे तीन नौदल तळ आणि एक एअरबेस आहे.

भारताचे आखाती देशांशी चांगले संबंध 
भारताचे आखाती देशांशी चांगले संबंध आहेत. भारताने आपली पहिली IIT देशाबाहेर संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना UAE चा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ झायेद मिळाला आहे. त्याच वेळी, बहरीनने पंतप्रधान मोदींना तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान 'द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स' देऊन सन्मानित केले. इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) मध्ये ५७ देशांचा समावेश आहे. यामध्ये पाकिस्तानही आहे जो काश्मीरचा मुद्दा कोणत्याही व्यासपीठावर मांडण्याची एकही संधी सोडत नाही. भारत ओआयसीमध्ये उपस्थित नसला तरी आखाती देश त्याला पाठिंबा देत आहेत. कलम ३७० आणि काश्मीरच्या मुद्द्यावर सौदी अरेबिया आणि यूएई वेळोवेळी भारताच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

Web Title: BJP spokesperson Nupur Sharma controversial statement on mohammad paigambar, What affect on Gulf Countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा