पाकिस्तान लष्कर आणि ISI च्या ठिकाणांवर BLAकडून हल्ला, ग्वादर बंदरावर भीषण गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 08:37 PM2024-03-20T20:37:20+5:302024-03-20T20:38:20+5:30
Gwadar port Attack: पाकिस्तानमधील ग्वादर येथे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने मोठा हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर या बंडखोर गटाने त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ग्वादर बंदरावर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तानमधील ग्वादर येथे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने मोठा हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर या बंडखोर गटाने त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ग्वादर बंदरावर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार बीएलएच्या मजिद ब्रिगेडने ग्वादरमधील मरीन ड्राइव्हजवळ हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
या हल्ल्याबाबत बीएलएचे प्रवक्ते जियंद बलूच यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि एमआयच्या कार्यालयांवर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला ३.३० रोजी करण्यात आला. तसेच ही कारवाई सुरू आहे. बीएलएकडून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. तसेच पुढील माहिती प्रसारमाध्यमांना दिली जाईल, असे बीएलएने सांगितले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सीमेपलीकडून होणारी कुठलीही दहशतवादी कारवाई सहन केली जाणार नाही, असं सांगितलं होतं, त्यानंतर काही वेळातच हा हल्ला झाला आहे.
प्रसारमाध्यमांमधून येत असलेल्या वृत्तांनुसार बलूच लिबरेशन आर्मीचे हत्यारबंद लढवय्ये आज दुपारी ग्वादकर पोर्ट ऑथॉरिटी कॉम्प्लेक्समध्ये घुसले. त्यानंतर त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. तसेच काही स्फोटही घडवण्यात आले. हल्ल्याबाबत मकरान कमिश्नर सईद अहमद उमरानी यांनी सांगितले की, पोलीस आणि सुरक्षा दलांचं एक मोठं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. अद्याप भीषण गोळीबार सुरू आहे. दरम्यान, ग्वादर बंदरावर करण्यात आलेला हल्ला हाणून पाडण्यात आला असून, ८ हल्लेखोरांना ठार मारण्यात आले आहे, असे काही पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे.