अमेरिकेत ‘ब्लॅक वेन्सडे’; असे का घडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 05:10 AM2021-01-08T05:10:56+5:302021-01-08T05:11:34+5:30
ट्रम्प समर्थकांचा संसदेच्या सभागृहात बळजबरीने प्रवेश, संसद सदस्यांना धमकावले, ट्रम्प यांच्या विजयाच्या दिल्या घोषणा, पोलिसांच्या मदतीने लोकप्रतिनिधींची सुरक्षित जागी रवानगी
वॉशिंग्टन : आमचे नेते ट्रम्पच निवडणुकीत जिंकले आहेत... कुठे लपले आहेत सारे, बाहेर निघा... अशा घोषणा आणि धमक्यांनी कॅपिटॉल इमारत बुधवारी हादरली. भेदरलेल्या लोकप्रतिनिधींनी सभागृहातील बाक, खुर्च्या किंवा आडोसा मिळेल तिथे लपण्यासाठी धाव घेतली आणि बिनधास्त ट्रम्प समर्थक त्यांना धमकावत राहिले, असे दृश्य होते कॅपिटॉल हिलवरचे...
संसदेबाहेर जमलेल्या ट्रम्प समर्थकांनी थेट कॅपिटॉल इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. अपुऱ्या पोलिस बळामुळे त्यातील काहींनी सिनेट, काँग्रेस आणि प्रतिनिधीगृहापर्यंत धडक मारली. एका हातात बंदूक व दुसऱ्या हातात ट्रम्प यांचे समर्थन करणारे फलक असे समर्थक लोकप्रतिनिधींना धमकावू लागले. काहींनी सिनेटच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा ताबा मिळवला. तर काहींनी अध्यक्षांच्या दालनाचा ताबा घेतला. अध्यक्षांच्या दालनातील मेजावर एकाने ठाण मांडले तर दुसऱ्याने खुर्चीत बसून मेजावर पाय ठेवले. त्याचवेळी ट्रम्प समर्थक सर्वांना धमकावत होते. पोलिसांनी सभागृहाला वेढा घातल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. लोकप्रतिनिधींना पोलिसांनी सुरक्षित स्थळी रवाना केले.
n अमेरिकी राज्यघटनेत १९६७ मध्ये २५वी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यात दोन प्रकारच्या परिस्थितींत अध्यक्षीय जबाबदाऱ्यांना नकार दिला जाऊ शकतो. पहिल्या परिस्थितीत अध्यक्षांच्या ऐच्छिक किंवा अनिवार्य अनुपस्थितीचा समावेश होतो. दुसऱ्या परिस्थितीत अध्यक्षांना पदावरून सक्तीने हटविण्याचा समावेश होतो. अध्यक्षीय कर्तव्ये बजावण्यास अध्यक्षाने नकार दिला आणि पदावरून पायउतार होण्यासही इन्कार केला तर अशा वेळी ही कारवाई होऊ शकते. ट्रम्प यांना अशा पद्धतीने व्हाइट हाउसच्या बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
n उपाध्यक्ष माइक पेन्स आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य बहुमताने ट्रम्प त्यांची अध्यक्षीय कर्तव्ये पार पाडू शकत नसल्याचे घोषित करत त्यांना पदावरून हटवू शकतात. असे झाल्यास २० जानेवारीपर्यंत पेन्स अध्यक्षपदी राहतील. परंतु पेन्स तसे करण्याची शक्यता अजिबातच नाही.
n समजा पेन्सनी तसे केलेच तर ४८ तासांत अमेरिकी काँग्रेस अधिवेशन बोलावून यावर निर्णय घेऊ शकते. ट्रम्प हे अध्यक्षीय कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम नाहीत, यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकी काँग्रेसला दोन तृतीयांश मते प्राप्त करण्यासाठी २१ दिवसांची मुदत असते. मात्र, ट्रम्प यांच्या कारकिर्दीला आता दोन आठवड्यांहून कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे ही शक्यताही नाही.
पुन्हा महाभियोग?
समर्थकांना चिथावण्यासाठी ट्रम्प यांनी केलेली वक्तव्ये ग्राह्य धरून महाभियोगाची कारवाई करण्याचा मार्ग अद्याप खुला आहे. परंतु त्यासाठी १३ दिवसांची मुदत आहे. ट्रम्प यांच्याविरोधात डिसेंबर, २०१९ मध्ये महाभियोग चालवण्यात आला होता. परंतु फेब्रुवारी, २०२० मध्ये सिनेटने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
कॅपिटॉल हिल परिसरात आज झालेला हिंसाचार इतिहास कधीच विसरणार नाही. निवडणूक निकालांबाबत सातत्याने अपप्रचार करून विद्यमान अध्यक्षांनी देशाला लाज आणली आहे.
बराक ओबामा, माजी अध्यक्ष.
अमेरिकेसारख्या महान लोकशाही देशात असा हिंसाचाराच प्रकार घडणे धक्कादायक आहे. सत्तांतराची प्रक्रिया लोकशाही पद्धतीने शांततेतच व्हायला हवी. घडले ते केवळ निंदनीय.
नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान
जगाचे नेतृत्व करणाऱ्या अमेरिकेत हे असे होणे म्हणजे लोकशाहीच्या ठिकऱ्या उडताना पाहण्यासारखे आहे. आता तरी अमेरिकी नेतृत्वाने शहाणे होत सत्तांतर शांततेने घडवून आणावे.
बोरिस जॉन्सन, ब्रिटनचे पंतप्रधान
अमेरिकेत झालेल्या प्रकाराची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. अमेरिकेत लवकरच सर्व पूर्वपदावर येईल, अशी आम्हाला आशा आहे.
हुआ चुनयिंग, चिनी परराष्ट्र
खात्याचे प्रवक्ता
पराभव स्वीकारतानाही मग्रुरी कायम
२० जानेवारी रोजी सत्तांतर शिस्तबद्धरीतीने होणार असले तरी अमेरिकेला पुन्हा महान बनविण्यासाठीचा आपला लढा सुरूच राहील, असे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट करत आपण शांत बसणार नसल्याचेच संकेत दिले आहेत. निवडणुकीत घोटाळा झाला असल्याचा पुनरुच्चारही ट्रम्प यांनी यावेळी केला.
इलेक्टोरल व्होटस् ची मोजणी आणि त्यानंतर झालेल्या प्रमाणपत्र वाटप सोहळ्यानंतर अमेरिकी अध्यक्षीय इतिहासातील सर्वांत महान अशी अध्यक्षपदाची पहिली कारकीर्द संपुष्टात आली. लढा पुढे सुरूच राहील.
डोनाल्ड ट्रम्प, मावळते अध्यक्ष
असे
का घडले
ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी आणि उपाध्यक्ष माइक पेन्स यांनीही या प्रकाराचे वर्णन अमेरिकी लोकशाहीतील काळा दिवस असे केले आहे. ट्रम्प यांचा पराभव स्पष्ट असतानाही हे असे का घडले, जाणून घेऊ या...
अमेरिकी मतदारांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडेन यांच्या पारड्यात भरभरून मते दिली. बायडेन यांना घसघशीत ३०६ मते मिळाली तर ट्रम्प यांना २३२ मतांवर समाधान मानावे लागले. हा पराभव ट्रम्प यांच्या जिव्हारी लागला. त्यांनी सातत्याने चिथावणारे टि्वट्स केले.
६ जानेवारीला होणारी इलेक्टोरल व्होट्सची मोजणी प्रक्रिया शांततेत व्हावी, अशी ट्रम्प यांची इच्छा नव्हती. सभागृहात पराभव झाला असला तरी आपल्या समर्थकांना चिथावणी देण्याचे काम ट्रम्प यांनी सुरूच ठेवले होते.
समर्थकांनी ट्रम्प यांच्या कथनाला प्रमाण मानत संसदेबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आणि एका क्षणी संसदेवर हल्ला चढवला. संसदेत प्रथमच बंदुका दिसल्या.