प्रेयसीच्या हत्येप्रकरणी 'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत वाढ, 13 वर्षे 5 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 02:47 PM2017-11-24T14:47:32+5:302017-11-24T14:58:02+5:30
प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्पच्या हत्येप्रकरणी 'ब्लेड रनर' म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेतील धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा वाढवून 13 वर्षे 5 महिने इतकी केली आहे.
केप टाऊन - प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्पच्या हत्येप्रकरणी 'ब्लेड रनर' म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेतील धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. ऑस्कर पिस्टोरियस याला आधी सहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. फिर्यादी वकिलांनी सहा वर्षांची शिक्षा फारच कमी असल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सहा वर्षांची शिक्षा वाढवून 13 वर्षे 5 महिने इतकी केली आहे. २०१३ साली व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी मॉडेल रिव्हा स्टिनकॅम्प हिची हत्या झाली होती व ऑस्करवर तिच्या खुनाचा आरोप लावण्यात आला होता.
न्यायालयाने नव्याने शिक्षा सुनावल्याने रिव्हा स्टिनकॅम्पच्या कुटंबाने न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली आहे. रिव्हा स्टिनकॅम्पची हत्या झाल्यानंतर आपण घरात चोर घुसल्याचे समजून गोळीबार केला. त्यात अनावधानाने रिव्हाचा मृत्यू झाला असा बचाव ऑस्कर पिस्टोरियसने केला होता. सर्वोच्च न्यायालयाने आज ऑस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत वाढ करत नव्याने शिक्षा सुनावली. ऑस्कर पिस्टोरियसने तुरुंगवासातील बराचसा काळ आधीच तुरुंगात घालवला आहे.
'ब्लेड रनर' म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेतील धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याला प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्प हिच्या हत्येप्रकरणी सहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर पिस्टोरियसला तत्काळ तुरूंगात नेण्यात आले होते.
2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने ऑस्करला दोषी ठरवत ५ वर्षांच्या तुरूंगावासाची शिक्षा ठोठावली, मात्र काही काळानंतर त्याची जामिनावरही सुटकाही झाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला सदोष मनुष्यवधाऐवजी हत्येच्या गुन्हयाखाली दोषी ठरवले होते. कनिष्ठ न्यायालयाने ऑस्करला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले होते. मात्र या शिक्षेला दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यानंतर ऑस्करला त्याच्या काकांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले. नंतर झालेल्या सुनावणी दरम्यान त्याला दोषी ठरवत सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.
२०१३ मध्ये व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी ऑस्करने त्याच्या घरी केलेल्या गोळीबारात प्रेयसी रिव्हाचा मृत्यू झाला होता. आपण घरात चोर घुसल्याचे समजून गोळीबार केला. त्यात अनावधानाने रिव्हाचा मृत्यू झाला असा बचाव त्याने केला होता. पॅराऑल्मपिकमध्ये सहा सुवर्णपदके मिळवणा-या ऑस्कर २०१२ लंडन मुख्य ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी झाला होता. शारीरीकदृष्टया अपंग असूनही मुख्य ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा तो पहिला धावपटू ठरला होता.